संग्रहित फोटो
खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव रूपाली विलास वाडेकर (वय ४६, मुळ रा. कल्याण, जि. ठाणे, सध्या रा. शिरोली, ता. खेड) असे आहे. संबधीत महिला मूळची ठाणे जिल्ह्यातील रहीवासी असून, गेल्या काही दिवसांपासून ती शिरोली येथे प्रियकराच्या घरी राहण्यास होती. संशयित आरोपी ललित दिपक खोल्लम (वय ३७, रा. शिंदेवस्ती, शिरोली, ता. खेड) याच्याशी रूपालीचे अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. त्याच रागातून ललितने रूपालीचा गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिरोली येथील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत दोघांमधील भांडणाचे आवाज आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले; मात्र नंतर साडेअकरा वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. खेड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन सुखदेव माताडे यांनी याबाबत फिर्याद दिली असून, संशयीत ललित खोल्लम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयीत आरोपी यापुर्वी काही वर्ष एका गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्यापुर्वी ठाण्यात असताना दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने ती नातेवाईकांकडे शिरोली येथे राहायला होती, असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत, संशयीत आरोपी खोल्लम हा घटनेनंतर फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.






