संग्रहित फोटो
सुरज सुरेश तिगंडे (वय ३३, रा. वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट), हरिष शिवाजी जाधव (वय ३४, रा. वांद्रापाडा, सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट), अमित चंदन गागडे (वय ३७, रा. कैलासनगर, फडके रोड, अंबरनाथ वेस्ट), अभिषेक चंदन गागडे (वय २४, रा. फातिमा चर्चच्या मागे, अंबरनाथ वेस्ट), सुमित कैलास गागडे (वय २५, रा. पंचशीलनगर हौसिंग सोसायटी, सुभाष टेकडी, उल्हासनगर) आणि एक ३२ वर्षीय महिला, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे इतर दोन साथीदार फरार झाले आहेत.
दिनांक २० सप्टेंबर रोजी फिर्यादी अंजलीदेवी अजित मोहिते या पुणे ते महाबळेश्वर या बसने शिरवळ बस स्टॉप येथून केंजळच्या (ता. वाई) दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी नसल्याचे लक्षात आले, याची तक्रार त्यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींची गुन्ह्यात वापरलेली चारचाकी निष्पन्न केली. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी एलसीबीचे पथक हायवेवर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत निष्पन्न झालेली चारचाकी (एमएच ०४ डीजे ०५४५) वाई तालुक्यातील बदेवाडी गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर सर्विस रोडवर उभी असल्याची माहिती मिळाली. गाडीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील बसस्टँडवर चोरी केली असल्याचे कबुल केले. या कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अभिनंदन केले.






