पुसेसावळी ते सैदापूर एसटी प्रवासात दोन लाखांचा ऐवज चोरीला (संग्रहित फोटो)
कराड : सैदापूर (ता. कराड) येथील एका महिलेचे पुसेसावळी ते सैदापूर दरम्यानच्या एसटी प्रवासात सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरीस गेला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे. मंगळवारी (दि.२८) हा प्रकार घडला. याप्रकरणी विद्या उमेश पिसाळ (वय ४५, रा. सैदापूर, ता. कराड. मूळ रा. चोराडे, ता. खटाव) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर राहण्यास असलेल्या विद्या पिसाळ दिवाळीसाठी मुळगावी चोराडे, ता. कराड येथे गेल्या होत्या. तेथून पुसेसावळी येथून दहिवडी -कराड एसटी बसमधून त्या कराडला येत होत्या. तत्पूर्वी, त्यांनी लक्ष्मीपूजनासाठी मूळगावी नेलेले दागिने लहान पर्समध्ये ठेवून ती पर्स मोठ्या पर्समध्ये ठेवलेली होती. पुसेसावळीवरुन त्या सैदापूर येथील कॅनालवर उतरल्या. त्यानंतर त्या रिक्षाने फार्मसी कॉलेजसमोर उतरल्या आणि तिथून त्या चालत घरी निघाल्या असताना दागिने व रोख रक्कम ठेवलेली पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी त्यांचे पती उमेश पिसाळ यांनी मोबाईवर संपर्क करुन संबंधित एसटी बसमध्ये पर्स पडली आहे का? याची विचारपूस करण्यास सांगितले.
पिसाळ यांनी संबंधित बसच्या वाहकांना पर्स पडल्याबाबत विचारले असता, त्यांनी शोध घेऊन पर्स पडली नसल्याचे सांगितले. त्यानंतर पिसाळ यांनी कृष्णा कॅनाल ते फार्मसी कॉलेजपर्यत शोध घेतला. मात्र, पर्स मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात येत दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. त्यामध्ये एक लाख ४५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ३३ हजार रुपये किंमतीचे कर्णफुले, नऊ हजारांची अंगठी आणि रोख रक्कम साडेचार हजार असा एक लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.






