मुंबई : अंधेरी आणि मालाडमधून दोन बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. अब्दुल आजाद अब्दुल हाय फारुख ऊर्फ आबिद आणि आसिफ नूरइस्लाम खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहे. यातील आसिफ हा गेल्या चौदा वर्षांपासून मुंबई शहरात (Mumbai City) वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
देशात अनधिकृतपणे वास्तव्यास (Unauthorised Residence) असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांची मोहीम सुरु आहे. अंधेरी (Andheri) आणि मालाड परिसरात काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर अंधेरीतील सर्व्हिस रोड, मोगरा पाडा परिसरातून आबिद याला ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. व्यवसायाने प्लंबर असलेला आबिद हा एका वर्षापूर्वी बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो मुंबईत वास्तव्यास होता. सध्या तो अंधेरीतील जुहू गल्ली, बीएमडब्ल्यू शोरुमसमोरील चाळीत राहतो.
दुसर्या घटनेत मालाडच्या मालवणी, झुणका भाकर केंद्राजवळ आसिफला मालवणी पोलिसांनी अटक केली. तो मिरा-भाईंदरच्या काशी व्हिलेजवळील जामा मशिद, गावठाण चाळीत राहतो. तो १४ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांसह बांगलादेशातून भारत आला होता. तेव्हापासून वेगवेगळ्या शहरात आणि आता मुंबईत वास्तव्यास होता. बांगलादेशातील गरीबी आणि उपासमारीला कंटाळून या दोघांनी भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.