सौजन्य - नवराष्ट्र टीम
गेल्या काही दिवसांपूर्वीच लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्यासमोरच हत्येची घटना घडली होती. यानंतर काही दिवसांमध्येच लातूर शहरातील औसा रोड या परिसरात काल सायंकाळी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरुन काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, या किरकोळ वादाचे रूपांतर खुनामध्ये झालं. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होता, तो हॉस्टेलवर राहत होता. तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुण घटना घडताच पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, पोलिसांनी आतापर्यंत चार तरुणांना ताब्यात घेतलं असून, याचा अधिक तपास सुरू आहे.
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात शेतातील घास कापल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






