
आमदार काळेंचे स्वीय सहाय्यक अरुण जोशींसह तिघे पोलिसांना शरण
कोपरगाव : २५ सप्टेंबर २०२५ रोजी कोपरगाव शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना) पक्षातील समर्थकांमध्ये झालेल्या दंगल आणि पोलिसांवर हात उचलण्याच्या गुन्ह्यात महिन्याभरापासून पसार असलेले आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी, त्यांचे भाऊ राजेंद्र जोशी आणि पुतण्या शुभम जोशी हे आज पोलिसांना शरण आले. या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापर्यंत धाव घेतली होती, मात्र सर्वच पातळीवर अपयश आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
कोपरगावमध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणात एकूण ६० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या १८ आरोपींना नुकताच, म्हणजे १७ ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, पोलिसांवर हात उचलण्याच्या आणि दंगलीच्या गुन्ह्यामुळे अरुण जोशी, राजेंद्र जोशी आणि शुभम जोशी यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
या तिघांनी सुरुवातीला कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी नाशिकमधील विशेष वकिलाची नेमणूक केली होती. परंतु, जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने, ‘तुम्ही अर्ज काढून घेणार की, मला तो फेटाळावा लागेल,’ अशी स्पष्ट सूचना केली. न्यायालयाच्या या सूचनेनंतर तिघांनीही आपला अर्ज काढून घेतला. कायदेशीर लढाईत सर्वच पातळीवर अपयश आल्यानंतर आज अरुण जोशी, राजेंद्र जोशी आणि शुभम जोशी हे कोपरगाव पोलिसांसमोर शरण आले.
दरम्यान, कोपरगाव (Kopargaon) शहरात 25 सप्टेंबरला रात्री 11.15 वाजेच्या सुमारास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील समर्थकांमध्ये दंगल झाली. दोन्ही बाजूने तलवार, लोखंडी राॅड, क्रिकेटचे स्टंप, लाकडी काठ्या, दगड, विटांची फेकाफेक झाली.