
कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे ही घटना घडली. धनंजय सुभाष शेटे (वय ४१) हे वारणानगर येथील वारणा संकुलात नोकरीला होते. मंगळवारी रात्री काम संपवून ते नेहमीप्रमाणे कारने घरी परतत होते. चिकुर्डे-करंजवडे मार्गावरून जात असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत धनंजय घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांच्याशी फोनवर संपर्कही होत नसल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.
बुधवारी धनंजय यांचा शोध घेत असताना चिकुर्डे-करंजवडे रस्त्यावरील एका विहिरीजवळ कारच्या आरशाचे आणि इंडिकेटरचे तुटलेले तुकडे आढळले. त्यामुळे कार विहिरीत कोसळली असावी, असा संशय बळावला. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने कारचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र अडथळ्यांमुळे ती थांबवावी लागली.
गुरुवारी पहाटे सहा वाजता कराड येथून विशेष क्रेन आणि पाणी उपसण्यासाठी हाय-पावर पंप मागवण्यात आले. कोल्हापूर येथील आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी विहिरीत उतरून कारचा शोध घेतला. त्यानंतर क्रेन आणि भक्कम दोरखंडांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये धनंजय यांचा मृतदेह आढळला. धनंजय शेटे यांच्या अकाली निधनाने शेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या धनंजय यांच्या मृत्यूमुळे ऐतवडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.