कणकवलीमध्ये महिलेचा मृत्यू (फोटो- istockphoto)
शस्त्रक्रियेआधी दिलेल्या इंजेक्शनमुळे विवाहितेचा मृत्यू
अवघ्या काही सेकंदातच महिला अत्यवस्थ
कणकवली उपजिल्हा रूग्णालयातील घटना
कणकवली: हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या श्रेया श्रीकांत लोकरे (४०, रा. कलमठ कोष्टीवाडी) यांचा शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती अस्वस्थ बनून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १२) दुपारी १.२० वा. सुमारास ही घटना घडली. श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलर्जी होती. मात्र, ही बाब त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. श्रेया लोकरे या काही दिवसांपूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कॅम्पमध्ये दाखल झाल्या होत्या.
तपासणीत श्रेया यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसारच श्रेया गुरुवारी सकाळच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र, तपासणीमध्ये श्रेया याच्या बेंबीला सूज दिसून आली. परिणामी शस्त्रक्रिया शुक्रवारी करायचे रुग्णालयातील डॉक्टरांमार्फत ठरविण्यात आले.
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी
दुपारी सुमारास श्रेया यांना शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच श्रेया अत्यवस्थ बनल्या. त्यांच्यावर रुग्णालयातील फिजिशियन डॉक्टर्सनी तत्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलजी असल्याची चाब एका खासगी रुग्णालयात यापूर्वीच निदर्शनास आली होती. मात्र, ही बाब श्रेया यांच्या कुटुंबियांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत श्रेया यांचे पती श्रीकांत दगडू लोकरे (कलमठ-कोष्टीवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कणकवली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रेया यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी
कणकवली शहरात खाजगी रुग्णालयांच्या तोडफोड प्रकरणानंतर डॉक्टर संघटनांनी २४ तास खाजगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यातील व आजूबाजूच्या गावांतील रुग्ण उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत असल्याने येथे रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. खाजगी रुग्णालये बंद असल्याने सरकारी रुग्णालयांवर उपचारांचा ताण वाढला असून, रुग्णांनी मात्र सरकारी रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा, वेळेवर उपचार आणि पुरेशी व्यवस्था मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






