
यवत पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद
पाटस : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयाच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या अट्टल टोळीला जेरबंद केले आहे. अखेर यवत पोलिसांना मोठे यश आले आहे. दोन लाखांच्या आसपास मुद्देमाल जप्त करत या टोळीतील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रुकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण, (वय ३१ वर्षे रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे) महेश संभाजी भोसले (वय २२ वर्षे रा. गुंडेगाव ता. जि. अहिल्यानगर ) व अमोल शास्त्री भोसले ( वय २० रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहे. त्यांनी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीचे गुन्हे केलेले उघड झाले आहे. खुनासह दरोडा व मोक्क्यातील सराईत हे आरोपी असून ते फरार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणि दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यंनी उचकटून घरात प्रवेश करून किचन रूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण १ लाख ९८ हजार ६७१ रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता. तसेच सांवत सुभाष शेळके यांच्या राहत्या घरात चोरीचा प्रयत्नही केला होता. त्याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याच्या अनुषंगाने यवत पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार गुरुनाथ गायकवाड व विकास कापरे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिस हवालदार गुरुनाथ गायकवाड व विकास कापरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपीबाबत माहिती मिळाल्याने यवत पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींनी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ ठिकाणी व उरळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ ठिकाणी घरफोडी व चोरी केल्याची कबुली दिली. तब्बल १० घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींनी अहिल्यानगर येथील सराफ दुकानदार किरण विलास बु-हाडे (वय ४६ वर्षे, रा. माळीवाडा, फुलार गल्ली ता. जि. अहिल्यानगर) यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यालाही सदर गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे.
एकूण १० गुन्हे विविध ठिकाणी दाखल
मुख्य आरोपी रुकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडी चोरी, दरोडा, जबरी चोरी व आर्म अॅक्टचे एकूण १० गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. तसेच त्याच्यावर उंब्रज पोलीस स्टेशन जिल्हा सातारा व शिरूर पोलिस स्टेशन येथे मोक्का अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. तो फरार होता. सराईत फरार गुन्हेगारास जेरबंद करण्यात यवत पोलिस ठाण्याच्या पथकास यश आले आहे.
पोलिस पथकाची कामगिरी
संदीपसिंह गिल, गणेश बिरादार, अविनाश शिळीमकर, नारायण देशमुख, महेश माने, कुलदीप संपकाळ, किशोर वागज, मारोती मेतलवाड, गुरूनाथ गायकवाड,संदीप देवकर, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप,विकास कापरे, दत्ता काळे, मारूती बाराते, अमोल भुजबळ, प्रतिक धिवार, सुधीर सोनवणे, विनीत कुऱ्हाडे, मोहन भानवसे, सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ, जनार्धन शेळके, संजय जाधव, योगेश नागरगोजे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.