
‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
‘मी आणखी किती सहन करू, मला हे आता सहन होत नाही, माझ्यावर अन्याय होतोय,’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर केल्यानंतर प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर अश्वी यादव उर्फ शिवांगी यादव राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. घराला कुलूप लावून ती निघून गेल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. दरम्यान, तिच्यासह सात जणांविरुद्ध तब्बल १ कोटी ७५ लाख ६८ हजार ६८३ रुपयांची खंडणी उकळल्याचा आणि आणखी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अश्वी यादव उर्फ शिवांगी यादव, नीतू सिंह यादव, शिवम यादव, गीतांजलि जादौन आणि अभिषेक यादव यांच्यासह सात जणांविरुद्ध खंडणी आणि ब्लॅकमेलिंगप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींनी तक्रारदारांचे खासगी फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीच्या आधारे एप्रिल २०२४ ते मे २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे आणि रोख स्वरूपात १ कोटी ७५ लाख ६८ हजार ६८३ रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
याशिवाय, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आणखी ५८ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अभिषेक यादव याने पुन्हा ५० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरथना परिसरातील झिंदुआ पुलाजवळ विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तक्रारदाराची कार अडवली. त्यांनी ५ कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आशुतोष उर्फ टोनू यादव यांच्या तक्रारीवरून भरथना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अश्वी यादवने इन्स्टाग्रामवर अनेक स्टोरी शेअर करून पोलिसांवरच गंभीर आरोप केले. आपण जबाब नोंदवण्यासाठी वेळेवर पोहोचले होते; मात्र आपला जबाब नोंदवून घेतला गेला नाही आणि आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा तिने केला आहे. या प्रकरणात संबंधित ठाणे प्रभारीदेखील सहभागी असल्याचा आरोप करत, पैसे घेऊन एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा अश्वीने केला. आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत तिने निष्पक्ष तपासाची मागणीही केली.
दरम्यान, अश्वी यादव घरातून निघून गेल्याने पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध घेतला जात असून, पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. अश्वी यादवने केलेल्या पोलिसांवरील आरोपांचीही चौकशी होते का आणि खंडणीप्रकरणातील आरोपांमागील नेमके तथ्य काय आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Ans: अश्वी यादव उर्फ शिवांगी यादव ही यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर आहे.
Ans: अश्वी यादवसह सात जणांवर १ कोटी ७५ लाख ६८ हजार ६८३ रुपयांची खंडणी उकळल्याचा आणि आणखी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.