
Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
रुडकी : उत्तराखंडमधील रुडकी येथे तीर्थयात्रेसाठी आलेल्या एका कुटुंबातील अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंब निवारागृहात मुक्कामी असताना चिमुरडी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती परतल्यानंतर पालकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एक कुटुंब तीर्थयात्रेसाठी रुडकीजवळील कलियर येथे आले होते. मुक्कामासाठी कुटुंब निवारागृहात थांबले होते. मंगळवारी संध्याकाळी चिमुरडी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतला. घटनेच्या वेळी तिचे पालक जवळील सामुदायिक स्वयंपाकघरात जेवण घेण्यासाठी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.
बुधवारी सकाळी चिमुरडी परतल्यानंतर तिने पालकांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी निवारागृह आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. संशयितांच्या हालचालींची माहिती घेतली जात असून, स्थानिकांकडेही चौकशी करण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली असून, संभाव्य ठिकाणी तपास सुरू आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासासमोर अडचणीही निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, संशयिताची ओळख आणि घटनेमागील संपूर्ण परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.