निवडणूक आयोगाकडून वडगाव मावळमध्ये मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. प्रचाराचा तोफा थंडावल्या असून उद्या (दि.20) मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. राज्यभरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. वडगाव मावळमध्ये देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारी केली असून मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात बुधवार (दि. 20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळी मतदान होणार आहे. मतदारांना आवाहन आहे की मतदान कार्डसह आणखी एक ओळखपत्र घेऊन मतदानासाठी केंद्रावर जावे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे. मतदारसंघात दहशतीचे वातावरण राहणार नाही. यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडा आणि मतदान करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
कोणत्याही मतदान केंद्रावर उमेदवार, उमेदवाराचे प्रतिनिधी तसेच मतदारांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास व वापरण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेला आहे, मतदान केंद्र अधिकारी व निवडणूक आयोगाने परवानगी दिलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मतदान केंद्र परिसरात मोबाईल घेऊन येण्यास व वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर येताना सोबत मोबाईल आणू नये, अशी सूचना नवले यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मावळात ४०२ मतदान केंद्रे, अडीच हजार कर्मचारी
मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ४०२ मतदान केंद्र आहे. त्यात एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. एकूण मतदार हे ३ लाख ८६ हजार १७२ आहेत. तसेच सर्व्हिस वोटर १२९ आहेत. त्यामध्ये १ लाख ९७ हजार ४३६ पुरुष असून १ लाख ८८ हजार ७२३ स्त्रिया आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष आणि तीन सहकारी असतील, ज्या मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार आहेत. तिथे एक अतिरिक्त अध्यक्ष असेल. एकूण मावळ मतदार संघात २५०० कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचे सुरेंद्र नवले यांनी सांगितले.