महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली असल्याच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sanjay Raut Marathi News : मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन अनेक महिने उलटले असले तरीत्यावरुन जोरदार राजकारण तापले आहे. कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट मुद्दे देखील मांडले आहे. यावरुन आता निवडणूक आयोगाने उत्तरे द्यावी अशी जोरदार मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या मत चोरीच्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलतात. त्यांनी यावर शोध संशोधन केले आहे. ते पुराव्यासह बोलले आहेत. राहुल गांधी यांनी मत चोरीचे जे पुरावे समोर ठेवले आहेत. त्याची शहनिशा अनेक पत्रकारांनी केली. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा कोंबला आहे, हे स्पष्ट दिसत आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक आयोगामध्येच इतके घोटाळे आहे. काल पवार यांनी मुद्दा मांडला, निवडणुकीपूर्वी लोक भेटले आणि १६० जागा देतो विविध रक्कम द्या. आम्हाला ही लोक भेटले आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभेला आणि विधानसभेला पण हे लोक भेटले होते. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकसभेला आम्हाला यश प्राप्त झाले आहे तेव्हा पुन्हा सांगितले विधानसभेलाही मिळेल. ते म्हणालेले ६०-६५ जागा चिंतेच्या सांगा, आम्ही त्या देऊ. पण त्यावेळी आमचा विश्वास निवडणूक आयोगावर विश्वास होता. पण आता राहुल गांधी यांनी पुरावे दिले त्याची चौकशी व्हावी,”अशी मोठी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्यातील महायुतीमधील अनेक नेते हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व कथित भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात राज्यस्तरावर जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन होईल. मुंबईतील आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. हे आंदोलन शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.