निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींचा आयोगाला पुन्हा इशारा
Rahul Gandhi News: निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट समजून घ्यावी, तुम्ही तुमचं काम केलं नाही तर, जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. इतकेच नव्हे तर, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार येईल, तेव्हा तुम्ही कुठेही असलात, तुम्ही निवृत्त झाले असलात तरीही आम्ही तुमच्यावर कारवाई करणार, हे लक्षात ठेवा. असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खडसावलं आहे.
गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर त्यांनी आयोगाकडून कशा पद्धतीने मतचोरी होत आहे, याचे पुरावेही सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोग विरूद्ध राहुल गांधी असा संघर्षच निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी आयोगानेही पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी शपथपत्र सादर करावे अन्यथा देशाची माफी मागावी, त्यांनी माफी नाही मागितली तर सात दिवसांनंतर त्यांचे आरोप बिनबुडाचे मानले जातील, असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं.
पण ज्ञानेश कुमार यांच्या या इशाऱ्यानंतर राहुल गांधी अधिकच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या मतदान हक्क यात्रेत पुन्हा एकदा आयोगाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व आयुक्तांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी. जर तुम्ही तुमचं काम नीटपणे केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता नरेंद्र मोदी यांच सरकार आहे ते ठीक आहे, पण कधी ना कधी एक दिवस बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल, तेव्हा आम्ही तुम्हाला बघून घेऊ, तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला शोधुन काढू, तुमच्यावर कारवाई करू, असा इशारा राहुल गांधींनी निवडणूक आयुक्तांना दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “मत चोरी हा संविधानावर हल्ला आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. मतांची चोरी हा भारतमातेवर हल्ला आहे. या लढाईत काँग्रेस आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत. आम्ही नरेंद्र मोदी किंवा निवडणूक आयोगाला संविधान आणि भारतमातेवर हल्ला करू देणार नाहीत. ‘जननायक’ ही पदवी बिहारच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण करत आहे.
हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
दुसरीकडे, बिहारच्या राजकारणात ‘मत चोरी’ वरून सुरू असलेली लढाई आता तीव्र झाली आहे. मतदार हक्क यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि निवडणूक आयोग मिळून गरीब, दलित, मागास आणि अल्पसंख्याकांची मते चोरण्याचा कट रचत आहेत. हे संविधान आणि लोकशाही अधिकारांशी थेट छेडछाड आहे. हे केवळ राजकारण नाही तर गरीब आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. पण इंडिया आघाडी कोणत्याही परिस्थितीत ही मतचोरी होऊ देणार नाही, लोकांच्या सैंविधानिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी कायम जनतेच्या सोबत उभी असेल.
दुसरीकडे, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीदेखील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर जोरदार टिका केली. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण जर विरोधी पक्षनेत्याला वाटत असेल की मते चोरीला जात आहेत, तर निवडणूक आयोगाने असे होत नसल्याचे पुरावे द्यावेत. अखिलेश यादव यांनी अशा १८ हजार मतदारांची प्रतिज्ञापत्रे देखील दिली आहेत ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत किंवा निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे हे लोक मतदान करू शकले नाहीत, अशा परिस्थितीत, प्रतिज्ञापत्र असूनही प्रेसमध्ये खोटे बोलण्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.