विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो - एक्स)
संगमनेर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. यंदाची निवडणूक ही अटी तटीची होण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात विधानसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला राज्यामध्ये न भुतो न भविष्यती असा विजय मिळाला. महायुतीला बहुमतापेक्षा अधिक मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांचा एतकर्फी विजय झाला. मात्र महायुतीच्या अंतर्गत कलहामुळे सरकार स्थापनेला विलंब झाला. आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मात्र विधानसभेमध्ये काँग्रेसचे अनेक बडे नेते पराभूत झाले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील महत्त्वपूर्ण नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधून निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर आता भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “विधानसभेच्या निवडणुका महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाल्या. मात्र, आता निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा किती सन्मान राहील हे माहिती नाही. सध्या एकनाथ शिंदे आजारी असू शकतात. पण शेवटी एवढ्या मेहनतीनंतर देखील त्यांचा सन्मान आहे की नाही हा प्रश्न आहे”, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी महायुतीबाबत उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महायुतीमध्ये खातेवाटपावरुन मतभेद असल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे हे गृहखाते व नगर विकास खाते यावर अडून राहिल्यामुळे सत्तास्थापनेला विलंब देखील झाला. तसेच मताधिक्य जास्त असल्यामुळे मंत्रिपदावरुन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आता त्यांच्याकडे संख्याबळ एवढं झालं की त्यांना आवरता आवरेना. नवीन आमदार त्यांना आवरत नाहीत असं दिसतं. त्यामुळे त्यांच्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं ही वस्तुस्थिती आहे.एवढा स्ट्राईक रेट कसा असू शकतो? २८८ उमेदवार उभे केले असते तर २५६ उमेदवार विजयी झाले असा कुठे इतिहास आहे का? आता महायुतीकडे एवढं मोठं संख्याबळ आहे ते संख्याबळ त्यांनाच त्रासदायक ठरतंय”, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगला स्ट्राईक रेट असणारे काँग्रेस विधानसभा निवडणूकीमध्ये जोरदार आपटले. या निकालावर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, असं आहे की तीन महिन्यांपूर्वी आमचं यश होतं. मात्र, तीन महिन्यांनंतर आमचं यश गेलं. आता त्याची कारणं खूप वेगळी आहेत. मात्र, तसं होणार नाही, कारण काँग्रेस ही काँग्रेस आहे आणि आम्ही काम करत राहणार आहोत”, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.