फोटो सौजन्य- सोशल मीडिया
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार वैभव नाईक हे भाजपला चांगलेच हादरे देत आहेत. या मतदारसंघातील कट्टर राणे समर्थकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे. या मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. माजी खासदार निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या पक्ष बदलावर त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.
आज दि. 12 नोव्हेंबरला मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील कट्टर राणे समर्थक भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रमुख कार्यकर्ते ओमकार मुरकर,शंकर हडकर,संतोष चंद्रकांत मुणगेकर, अनिल चौकेकर,अमोल हळदणकर आदी प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. .आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.
भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडला
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडला गेल्यामुळे आपण नाराज झालो असून आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन बांदिवडे गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते बांदिवडे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की, सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी बांदिवडे गावामधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे.याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उदय दुखंडे,समीर हडकर, छोटु पांगे,संजय राणे, आप्पा परब, पप्पू परुळेकर, शाखाप्रमुख बाबुराव गावकर मधुकर परब,आबु घागरे,माजी सरपंच संजय राणे,श्रुती गावकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
उद्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता टोपीवाला हायस्कुल मालवण येथे ही सभा आयोजित केली गेली आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय हल्लाबोल करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण आणि जिल्ह्यातील इतर दोन्ही मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे.