धनंजय मुंडे आणि अमित ठाकरे यांच्या मतदारसंघातील परिस्थिती
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. आता या निवडणुकीची मतमोजणी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. पण आता सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आता कल यायला सुरुवात झाली आहे.
महायुती आघाडीत भारतीय जनता पक्षाने 149 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले होते, शिवसेनेने 81 जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 59 जागांवर उमेदवार उभे केले होते. विरोधी MVA आघाडीमध्ये, काँग्रेसने 101 उमेदवार, शिवसेना (उबाठा) 95 आणि राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) 86 उमेदवार उभे केले. बहुजन समाज पार्टी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) सारख्या पक्षांनीही निवडणूक लढवली, ज्यामध्ये बसपने 237 उमेदवार उभे केले आणि एआयएमआयएमने 17 उमेदवार उभे केले.
बीडमधून धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर आहेत. पाटण मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीत शंभूराज देसाई आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. खामगाव मतदारसंघातून आकाश दादा फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी पहिल्या फेरीमध्ये मिळाली आहे. याशिवाय, पालघरमध्ये पोस्टल मतदानात महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतमोजणी सुरू आहे.
कळवणमध्ये टपाली मतमोजणीत माकपचे जेपी गावीत आघाडीवर
हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर, पोस्टल मतांच्या फेरीतून चेतन तुपे आघाडीवर आहेत.
औसा विधानसभा मतदारसंघ टपाली मतमोजणी सुरुवात झाली आहे. भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत. तर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
अमित ठाकरे चुकवणार अंदाज
माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदाच माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे लढत देत असून निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सर्वांचे लक्ष अमित ठाकरे यांच्याकडे लागून राहिले आहे. विधानसभेच्या निकालाआधीच विद्यमान आमदार सदा सरवणकर जिंकून येतील असा अंदाज बांधला जात होता. तर एक्झिट पोलनुसार अमित ठाकरे पिछाडीवर राहतील असा अंदाज होता. मात्र सुरूवातीलाच अमित ठाकरे यांनी आपला जम बसवला असल्याचे दिसून येत आहे आणि लवकरच हा निकाल जाहीर होईल. तर पहिल्यांदाच अमित ठाकरे बाजी मारणार की नाही हे पाहावं लागणार आहे
माहीमच्या धुरा कोणाच्या हाती?
माहीम मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये 52.67 टक्के मतदान झाले होते आणि आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. तर हा वाढलेला टक्का नक्की कोणाच्या बाजूने झुकणार आणि अमित ठाकरे यांना त्याचा फायदा मिळणार का?