Sadhu Katke and Santosh Katke in shivsena
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका वाढल्या आहेत. केंद्रीय नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान आणि ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
आरपीआयचे जिल्ह्याध्यक्ष म्हणून साधू कटके आणि त्यांचे मुलगा संतोष कटके यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. संतोष कटके यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवला. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवल. तसेच गद्दार म्हणून घोषणबाजी केली. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा देखील पारा चढला. त्यांनी ताफा थांबवून जाब विचारला. यामुळे साधू कटके व संतोष कटके हे चर्चेमध्ये आले आहेत. यानंतर त्यांनी थेट मातोश्री गाठली असून कटके पिता पुत्राचा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (दि.11) साकीनाका येथे जाहीर सभा झाली. ही सभा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा रस्त्याने जात होता. त्यावेळी शिंदे यांचा ताफा संतोष कटके यांनी अडवला. उमेदवार नसीम खान यांच्या कार्यालयासोंर हा प्रकार घडला आहे. या वेळी अपशब्दही बोलल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गाडीतून थेट खाली उतरावे लागले होते. एकनाथ शिंदे यांनी जाब विचारत कार्यकर्त्यांना हेच शिकवता का असा सवाल केला. यामुळे प्रकारानंतर पोलिसांनी संतोष कटके यांना ताब्यात घेतले आणि दंड भरायला लावला. या प्रकरणानंतर आज सकाळी कटके पिता पुत्राने शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.
कालच्या या प्रकारानंतर संतोष कटके यांनी आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच संतोष कटके यांच्या या कृतीनंतर आता साधू कटके यांनीदेखील आरपीआयची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर हा फोटो त्यांच्यापर्यंत जाऊ दे असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गट व ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवणारा व्यक्तीचा थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला आहे.