भाजप बबनराव लोणीकर यांचे मराठा समाजाबाबत वादग्रस्त विधान केले. (फोटो - सोशल मीडिया)
जालना : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि मराठा समाज महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. मागील दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर रान उठवलं आहे. मात्र निवडणुकीमधून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज यंदाचा महायुती मागे उभा राहणार की महाविकास आघाडीच्या मागे उभा राहणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये आता भाजप नेते व परतूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार राजकारण रंगले. मराठा समाजाने रोष व्यक्त देखील केला. तसेच सोशल मीडियावर देखील याची व्हिडिओ व्हायरल झाली. या व्हिडिओमध्ये बबनराव लोणीकर म्हणत आहेत की, “आष्टी गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची मतं बोटांवर मोजण्याइतकी आहेत. मात्र हे गाव सर्व समाजांचं गाव आहे. सगळ्या जाती-धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेंडे, कांबळे सगळे आहेत,” असे विधान बबनराव लोणीकर यांनी केले.
हे देखील वाचा : नेत्यांच्या बॅगा तपासण्यावरुन तापलं राजकारण! काहींची नाराजी तर अनेकांचे समर्थन
मराठा समाजाची मतं केवळ बोटावर मोजण्याएवढी असल्याचे बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा रंगली. यामुळे आता बबनराव लोणीकर यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. बबनराव लोणीकर यांनी माध्यमांशी संवाद साधून आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
बबनराव लोणीकर म्हणाले की, “माझ्या भाषणात मी म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावात कमी आहे. गाव एससी. एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लिम अशा अठरापगड जातींचं गाव आहे. ४० वर्षे या गावाने भाजपाला मताधिक्य दिलं आहे. मराठा समाजाची ६० ते ७० टक्के मतं मला मिळतात. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे, असे स्पष्टीकरण उमेदवार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.
हे देखील वाचा : फोटो काढताना कार्यकर्ता मध्ये आल्याने दानवेंनी लाथच मारली; व्हिडिओ व्हायरल होताच…
मागील दीड वर्षांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला. जरांगे पाटील यांनी उपोषण, आंदोलन आणि रॅली काढून आरक्षणाची मागणी केली. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केली नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला होता. मात्र अखेरच्या दिवशी ऐनवेळेस जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांमधून देखील मराठा आरक्षण या विषयांवर अनेकदा भाष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे मराठा समाज मतदानरुपी आशिर्वाद कोणत्या आघाडीला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.