राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. जाणून घेऊया आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करु नये याबद्दल
आचारसंहिता काळात काय करावे?
निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. आचारसंहितेच्या काळात मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची अथवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका करताना ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना होणाऱ्या सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवणे आवश्यक आहे आणि ते वापरण्याच्या नियमांचेही आयोजकांनी पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. ज्या ठिकाणाहून मिरवणूक सुरू होणार आहे आणि जिथे संपणार आहे तसेच जिथून जाणार आहे तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.
आचारसंहिता काळात काय करू नये?