
संगीत क्षेत्रावर शोककळा! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन (Photo Credit - X)
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या जाण्याने संगीतविश्वातील एक अजरामर पर्व संपले. त्यांच्या मधुर, कोमल आणि विलक्षण भावस्पर्शी आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील त्या एक… pic.twitter.com/9M7kSkXKYS — Rajendra Darda (@RajendrajDarda) May 31, 2026
भारतीय संगीत विश्वात आपल्या मधाळ आवाजाने आणि अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे योगदान अतुलनीय आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि शब्दांमधील भाव अचूक टिपण्याची कला यामुळे त्यांनी गायलेली गाणी आजही प्रत्येक पिढीच्या ओठांवर रेंगाळत आहेत. गझल, ठुमरी, भावगीते आणि भक्तीगीते अशा विविध गायन प्रकारांवर त्यांनी आपली हुकमत गाजवली.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातील (आताचा बांगलादेश) भवानीपूर येथे झाला होता. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. त्यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे वडील शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले आणि शास्त्रीय संगीताचा अगदी कसून अभ्यास केला. पुढे रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, लग्नापूर्वीच त्यांनी अनेक गाणी गाऊन संगीत क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती.
सुमनजींनी पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. १९५४ मध्ये ‘दरवाजा’ चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन केले. सुरुवातीला त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत साम्य असल्यामुळे काही संगीतकारांनी “दुसरी लता” म्हणून पाहिले, पण त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही किंवा आक्रस्ताळेपणा केला नाही. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या “मंगु” या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते “कोई पुकारे धीरे से तुझे”. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. सुमन कल्याणपुर यांच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते.
“जिथे सागरा धरणी मिळते” असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, “घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात” असे म्हणणारी सासुरवाशीण, “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि” हि अंगाई, “कशी गवळण राधा बावरली” हि गवळण, “सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी” हे विरहगीत, “नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे”, “केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर” हे भावगीत, “केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा”, “जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे”, “देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा” सारखी भक्तीगीते, “उठा उठा चिऊताई”, “या लाडक्या मुलांनो या” सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो.
सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली. यशवंत देव त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे सुमन कल्याणपूर. त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली. सुमन कल्याणपुर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे.
“न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया”, “ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा”, “तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी”, “परबतो के पेडो पर शाम का बसेरा है”, “अज हु ना आये बालमा”, “तुमने पुकारा और हम चले आये” “मेरे मेहबुब न जा”, “नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे”, “आपसे हमको बिछडे हुए”, “चले जा चले जा….जहां प्यार मिले”, “मन गाए वो तराना”, “दिल ने फिर याद किया” या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले.
काही अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या “चांद” ह्या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या.सुमन कल्याणपूर यांनी तब्बल ७४० चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीने दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार सुमनताई कल्याणपूर यांना मिळाला होता.
सुमनताईंच्या मराठी भावगीत गायनाची सुरुवात आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या गीताने झाली. त्यांचे स्पष्ट शब्दोच्चार आणि सुरांचा लडिवाळपणा यामुळे ही गाणी अजरामर झाली. संगीत क्षेत्रातील त्यांच्या या अमूल्य आणि प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा ‘पद्मभूषण’ (Padma Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय त्यांना गदिमा प्रतिष्ठानचा ‘गदिमा पुरस्कार’ आणि प्रतिष्ठित ‘पुलस्मृती पुरस्कारा’सह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सुमन कल्याणपूर यांनी केवळ एकल गाणीच गायली नाहीत, तर तत्कालीन भारतीय संगीत सृष्टीतील दिग्गज गायकांसोबत अनेक सुपरहीट युगुलगीते दिली. यामध्ये मोहम्मद रफी, मन्ना डे, तलत महमूद आणि हेमंत कुमार यांच्यासारख्या महान गायकांचा समावेश आहे. त्यांच्या अष्टपैलू गायकीमुळे त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले.