(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aishwarya Rai Abhishek Bachchan: दिवाळी सुरू झाली की बॉलिवूडमध्येही पार्टी आणि सेलिब्रिटींच्या स्टायलिश लूकची चर्चा रंगू लागते. यंदाही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, या सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या जोडीने.
ऐश्वर्या आणि अभिषेक बऱ्याच काळानंतर इतक्या मनमोकळ्या अंदाजात एकत्र दिसल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पार्टीत पोहोचल्यापासूनच या जोडीने आपल्या स्टाइल आणि रोमँटिक अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांनी हातात हात घालून पार्टीत एन्ट्री केली. त्यानंतर फोटोग्राफर्ससमोर पोज देतानाही त्यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळाली.
कधी ऐश्वर्या अभिषेकच्या जवळ उभी राहून पोज देताना दिसली, तर कधी त्याच्या मिठीत हसताना दिसली. एका क्षणी तिने अभिषेकच्या खांद्यावर डोकं ठेवूनही फोटोसाठी पोझ दिली. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्यातील जिव्हाळा पाहून चाहत्यांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
या खास पार्टीसाठी ऐश्वर्याने सोनेरी धाग्यांचं नाजूक भरतकाम असलेली सुंदर लाल साडी नेसली होती. लाल साडी, त्याला साजेसा पारंपरिक लूक आणि लाल लिपस्टिक यामुळे अभिनेत्रीचा अंदाज खुलून दिसत होता. तर अभिषेक बच्चन काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये क्लासी आणि देखणा दिसत होता. दोघांचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या रोमँटिक केमिस्ट्रीचं कौतुक होत असतानाच अभिनेत्रीच्या लूकवरून सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी टीकाही केली. एका नेटकऱ्याने ‘पहिल्यांदा अभिषेक ऐश्वर्यापेक्षा चांगला दिसतोय’, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने ‘ऐश्वर्याचं काहीतरी चुकतंय’, असं म्हटलं. काहींनी तिच्या लाल लिपस्टिकवरही टिप्पणी केली. त्यामुळे मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील ऐश्वर्या-अभिषेकची रोमँटिक केमिस्ट्री आणि ऐश्वर्याचा लूक दोन्ही चर्चेत आले आहेत.






