
फोटो सौजन्य - Social Media
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘हैवान’मध्ये अक्षय कुमारसोबत सैफ अली खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम कल्ट सायकोलॉजिकल थ्रिलर ‘ओप्पम’चा हिंदी रिमेक असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ‘ओप्पम’मध्ये मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती, तर समुथिरकानी यांनी खलनायकाची भूमिका निभावली होती. सूडाच्या भावनेवर आधारित या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी खलनायक त्याच्या मुलीला लक्ष्य करतो. मात्र त्या मुलीचे संरक्षण करण्यासाठी एक दृष्टिहीन व्यक्ती पुढे येतो आणि त्यानंतर उलगडणारा थरार प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
‘हैवान’ची कथाही याच संकल्पनेवर आधारित असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे ‘ओप्पम’चे दिग्दर्शनही प्रियदर्शन यांनीच केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या यशस्वी मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक साकारल्याची चर्चा आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओप्पम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यामुळे आता ‘हैवान’लाही तितकेच यश मिळते का, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निर्मात्यांनी ‘हैवान’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असून, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत अभिनेत्री सैयामी खेर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.