अमृता खानविलकरची थेट वॉर्निंग! (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एक पोस्ट मराठी भाषेत, तर दुसरी इंग्रजी भाषेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि दाव्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. (Amruta Khanvilkar Divorce Rumors)
अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘अधिकृत कायदेशीर निवेदन – १० ऑगस्ट २०२६ पासून लागू’ असे नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक तसेच गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे तिच्या निदर्शनास आले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या स्वातंत्र्याचा गैरवापर करून अमृताबाबत बदनामीकारक विधाने, अफवा, पडताळणी न केलेले आरोप किंवा खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध, प्रसारित किंवा शेअर केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
View this post on Instagram
अमृता खानविलकरच्या कायदेशीर टीमकडून जारी करण्यात आलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अशा प्रकारचा मजकूर तयार करणाऱ्या, प्रसिद्ध करणाऱ्या, प्रसारित करणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच, अशा प्रकारच्या मजकुरावर लक्ष ठेवले जात असून, भविष्यातील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित माहिती आणि पुराव्यांची नोंद केली जात असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
View this post on Instagram
अमृताने शेअर केलेल्या या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान तिने घेतलेल्या या भूमिकेचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे.






