Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाश (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
South Star Ravi Prakash: दक्षिणेतील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता रवि प्रकाश आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याला प्रामुख्याने साऊथच्या सिनेमांमध्ये पाहिलं गेलं आहे. मात्र तो थेट मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दशमी या आगामी सिनेमात रवि प्रकाश महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आधीपासूनच वाढली आहे. मराठी चित्रपटात काम करण्यापूर्वी रवि प्रकाशचे भाषेवर विशेष मेहनत घेतल्याचं समोर आलं आहे. मराठी संवाद सहज बोलता यावेत, स्थानिक भाषेचा लहेजा समजावा आणि भूमिकेत कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने चक्क मालिकेचा आधार घेतला. विशेष म्हणजे शिकवणारी ही मालिका अनेक घरांमध्ये लोकप्रिय आहे.
रवि प्रकाशने ‘लग्नानंतर होईलच प्रेम‘ ही मालिका पाहून मराठी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सेटवर वेळ मिळेल तेव्हा तो लॅपटॉपवर ही मालिका पाहायचा. संवाद ऐकून त्यातील शब्द लक्षात ठेवण्याचा आणि मराठी बोलण्याची समजून घेणं अधिक सोपं जातं, असंच काहीसं त्याच्या बाबतीत झालं. या मालिकेशी जोडलेला एक मजेशीर प्रसंगही रवि प्रकाशने सांगितला.तो शूटिंगच्या ठिकाणी लॅपटॉपवर मालिका पाहत असताना त्याच मालिकेतील अभिनेता प्रसन्न केतकर अचानक सेटवर आला. पडद्यावर ज्याला पाहत होता. तोच कलाकार समोर उभा असल्याचं पाहून रविला क्षणभर आश्चर्य वाटलं. हा किस्सा सांगताना त्याने आपला अनुभवही शेअर केला.
इतकंच नाही तर एका कार्यक्रमात त्याची मालिकेतील अभिनेता विजय आंदळकरसोबतही भेट झाली होती. त्यामुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रवि प्रकाशसाठी केवळ मनोरंजनाचा भाग राहिली नाही, तर मराठी भाषेशी जवळीक निर्माण करण्याचं एक साधन ठरली. आता रवि प्रकाश ‘दशमी’च्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश भोसले यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी ‘मंगलाष्टक रिटर्न्स’, ‘बाजार’ आणि ‘आम्ही जरांगे’ यांसारख्या चित्रपटांवर काम केलं आहे. त्यामुळे ‘दशमी’मध्ये नेमकी कोणती कथा पाहायला मिळणार, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला रवि प्रकाशसह चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. पोस्टर समोर आल्यानंतर सिनेमातील कलाकारांची निवडही चर्चेचा विषय ठरली. ‘दशमी’मध्ये रवि प्रकाशसोबत महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, देवेंद्र गायकवाड, प्रसन्न केतकर आणि गौरी इंगवले यांसारखे कलाकार दिसणार आहेत.
View this post on Instagram
अनुभवी कलाकार आणि नव्या चेहऱ्यांचा हा मेळ चित्रपटासाठी खास ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची माहिती आहे. सणाच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
दक्षिणेतील अभिनेता मराठी चित्रपटात दिसणार, ही गोष्ट स्वतःमध्येच उत्सुकता वाढवणारी आहे. त्यातही भूमिका साकारण्यासाठी रवि प्रकाशने मराठी भाषा शिकण्याचा घेतलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. आता त्याने मालिकेतून शिकलेली मराठी पडद्यावर किती सहजपणे वापरली आहे, त्याचा अभिनय कसा आहे आणि ‘दशमी’ची कथा प्रेक्षकांना किती भावते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.






