Carrom Championship : सावंतवाडीच्या भरत सावंतचा कॅरममध्ये डंका! प्रल्हाद नलावडे स्मृती चषकावर कोरले नाव
Carrom Championship : कांदिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीच्या भरत सावंतने विजेतेपद पटकावले. आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भरतने अंतिम सामन्यात पोद्दार अकॅडमी-मालाडच्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेचा 11-10 असा पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले. विशेष म्हणजे, निर्णायक बोर्डापूर्वी 11-7 अशी आघाडीवर असलेल्या प्रसन्नला भरतने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मात दिली.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाई फाउंडेशन आणि अविनाश नलावडे स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिनको चॅम्पियन कॅरम बोर्डवर रंगलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील 68 शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत प्रसन्न गोळेने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, अंतिम सामन्यात भरत सावंतने त्याला कडवी झुंज दिली. निर्णायक बोर्डापूर्वी 11-7 अशी आघाडी असतानाही प्रसन्नला विजेतेपद मिळवता आले नाही. भरतने 11-10 असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबईतील सर्व सामने
उपांत्य फेरीत भरत सावंतने प्रथम मानांकित केवल कुळकर्णीचा 15-3 असा एकतर्फी पराभव केला. तर प्रसन्न गोळेने राजापूरच्या निधी सप्रेचा 16-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेत एसकेकेंई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी आणि विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे यांनी उपांत्य उपविजेतेपद मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत संकल्प व्हॅली स्कूल-पुणेचा हर्षित शिंदे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, डॉन बॉस्को हायस्कूल-कणकवलीची दिव्या राणे आणि होली फॅमिली हायस्कूल-अंधेरीचा चैतन्य पोमेंडकर यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील पहिल्या 16 विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक आणि स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, विजय नलावडे, फाउंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर लोहे, प्रमुख पंच संतोष जाधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.
दिव्यांश सिंग, आदित्य चौहान, वेदांश प्रजापती, हर्ष नागदा, देवांश बेलोसे, अनय म्हेत्रे, गौरी सावंत आणि विहा राणे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवले.
दरम्यान, बीएमसीच्या इच्छुक शाळांनी मोफत कॅरम मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण आणि सल्लागार अविनाश नलावडे यांनी केले आहे.






