Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिग्दर्शक सैलेश रत्नकुमार यांचा हा पहिलाच फीचर फिल्म प्रोजेक्ट आहे. 6 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या 31व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सेल्वी’चा वर्ल्ड प्रीमियर होईल. ‘व्हिजन एशिया’ या विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. आशियातील नव्या दिग्दर्शकांच्या कलाकृतींना या विभागातून मोठं व्यासपीठ मिळतं.
‘सेल्वी’ची कथा अशा महिलांभोवती फिरते, ज्या घरगुती आरोग्यसेवा देण्याचे काम करतात. दुसऱ्यांच्या घरात राहून आजारी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या या महिलांचं स्वतःचं आयुष्य मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतं. कामाचा ताण, घरापासून दूर राहण्याची वेळ, नवीन ठिकाणी जुळवून घेण्याची धडपड आणि मनात साचणाऱ्या भावना या सगळ्यांचा या चित्रपटात वेध घेतला आहे.
कथेची कल्पना दिग्दर्शक सैलेश रत्नकुमार आणि सिनेमॅटोग्राफर भार्गव श्रीधर यांनी मिळून विकसित केली. भार्गव यांच्या आईच्या आजारपणात घरच्या नर्सेसकडून मिळालेली सेवा त्यांनी जवळून पाहिली. त्या काळात या महिलांचे आयुष्य, त्यांची परिस्थिती आणि त्यांच्या रोजच्या अडचणी लक्षात आल्या. त्यातूनच ‘सेल्वी’ची कथा आकाराला आली. Film Festival:
सैलेश स्वतः कोयंबतूरहून चेन्नईला आलेला असल्याने स्थलांतराचा अनुभव त्याच्यासाठीही नवीन नव्हता. त्यामुळे आपल्या शहरापासून दूर जाऊन दुसऱ्यांसाठी काम करणाऱ्या महिलांच्या जगाशी त्याला एक वेगळं नातं जाणवलं.चित्रपटातील प्रमुख भूमिका अंजली पाटीलने साकारली असून, ती या सिनेमाची निर्मातीही आहे. ‘अनाहत फिल्म्स’ या तिच्या बॅनरखाली हा प्रोजेक्ट तयार झाला आहे. अभिनय क्षेत्रात वेगळी छाप पाडल्यानंतर निर्मितीमध्येही स्वतःच्या आवडीच्या कथा पुढे आणण्याचा अंजलीचा प्रयत्न आहे.
‘सेल्वी’ हा अनाहत फिल्म्सचा पहिला पूर्ण लांबीचा तमिळ चित्रपट ठरणार आहे. याआधी या संस्थेने विविध विषयांवरील फिक्शन आणि नॉन-फिक्शन प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटातून बॅनरची नवी दिशा प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमामागे अनुभवी तंत्रज्ञांची टीमही आहे. तब्बल नऊ राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले ए. श्रीकर प्रसाद यांनी चित्रपटाचं एडिटिंग केलं आहे. ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट वन’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आनंद कृष्णमूर्ती यांनी साऊंड डिझाईनची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटाला रेड सी फंड आणि हाँगकाँग एशिया फिल्म फायनान्सिंगकडूनही सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे ‘सेल्वी’चा प्रवास भारतापुरता मर्यादित न राहता जागतिक चित्रपटविश्वात पोहोचण्याची संधी मिळाली आहे. सानसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचा पहिला प्रयोग होणे ही ‘सेल्वी’च्या संपूर्ण टीमसाठी मोठी गोष्ट आहे. आता या चित्रपटाकडे आंतरराष्ट्रीय प्रेक्षक आणि चित्रपटविश्वाचे लक्ष लागले आहे.






