( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ankita Lokhande : सध्या देशभरात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. घरोघरी गणरायाची स्थापना झाली असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूडपासून मराठी मनोरंजनसृष्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा गणपती आरतीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अंकिता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली असून, काही युजर्सनी तिच्यावर टीका करत तिला ट्रोल केलं आहे.
टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानी याच्या घरी गणरायाची स्थापना करण्यात आली होती. बाप्पाच्या दर्शनासाठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या घरी हजेरी लावली. यावेळी अंकिता लोखंडे पती विक्की जैनसोबत अर्जुनच्या घरी पोहोचली होती.
याच दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये गणरायाची आरती सुरू असताना अंकिता उत्साहात डुलताना दिसत आहे. आरतीदरम्यानचा तिचा हा अंदाज पाहून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अंकिताचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला. काहींनी तिच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल केलं. एका युजरने थेट “ही दारू पिऊन आलीये का?” अशी कमेंट केली. तर दुसऱ्या युजरने “सस्ता नशा” असं म्हटलं.
आणखी एका युजरने अंकिताला उद्देशून “तू क्लबमध्ये आलीस का? हा क्लब नाही, जरा व्यवस्थित वाग” अशी प्रतिक्रिया दिली. तर एका युजरने “माहीत नाही कोणता नशा करून आलीये” असं लिहिलं. काही नेटकऱ्यांनी अंकिताला ‘वेड लागलंय’ अशा शब्दांतही ट्रोल केलं.
अंकिताच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी टीका केली असली, तरी सोशल मीडियावरील या प्रतिक्रिया संबंधित युजर्सची वैयक्तिक मतं आहेत. व्हिडीओमध्ये अंकिता आरतीदरम्यान उत्साहात सहभागी होताना दिसत असली, तरी तिच्या वागण्यामागील नेमकं कारण तिने स्पष्ट केलेलं नाही.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो, व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स अनेकदा चर्चेत येतात. आता गणपती आरतीदरम्यानचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.






