( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Meghna Erande Joshi: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मेघना एरंडे-जोशी यांच्यासाठी गणेशोत्सव हा केवळ सण नसून, बालपणापासून जपलेल्या आठवणी, कुटुंबाच्या परंपरा आणि बाप्पासोबतच्या खास नात्याचा अविभाज्य भाग आहे. एरंडे कुटुंबातील गणेशोत्सवापासून लग्नानंतर जोशी कुटुंबातील परंपरांपर्यंत आणि आता ‘सनई चौघडे’ मालिकेच्या माध्यमातून परब कुटुंबाचा गणेशोत्सव अनुभवण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास खास आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘सनई चौघडे’च्या निमित्ताने मेघना यांनी पहिल्यांदाच कोकणातील गणेशोत्सवाचा अनुभव घेतला. या खास आठवणींबद्दल सांगताना त्यांनी यंदाचा गणेशोत्सव आपल्यासाठी खऱ्या अर्थाने विशेष असल्याचं म्हटलं.
मेघना एरंडे-जोशी म्हणाल्या, “यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आतापर्यंत मी फक्त एरंडे आणि जोशी हे दोनच गणेशोत्सव साजरे करत होते. पण या वर्षीपासून परबांचा गणेशोत्सवही साजरा करणार आहे.”
बालपणापासून त्यांच्या माहेरी गणेशोत्सवाची परंपरा असल्याचं त्या सांगतात. घरातील सर्वात लहान मुलगी असल्यामुळे गणपतीच्या आगमनानंतर त्यांना प्रसाद वाटण्यासारखी छोटी-छोटी कामं दिली जायची. लग्नानंतर जोशी कुटुंबात आल्यानंतर स्वयंपाकापासून गणेशोत्सवातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी शिकून घेतल्या. आता गणपती स्थापनेची पूजा देखील त्यांना करता येते.
‘सनई चौघडे’ मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने मेघना यांना यंदा कोकणातील गणेशोत्सव जवळून अनुभवता आला. याआधी त्या कधीही कोकणात गेल्या नव्हत्या. मालिकेत हरतालिकेपासून गौरीपर्यंतचा गणेशोत्सव उभा करण्यात आला आहे.
“कोकणात झालेल्या गणेशोत्सवाच्या या शूटिंगमुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे,” असं मेघना यांनी सांगितलं. मालिकेत साकारण्यात आलेला हा गणेशोत्सव प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
‘सनई चौघडे’च्या टीमला गणेशगल्लीच्या राजाच्या पाद्यपूजनासाठी नेण्यात आलं, तेव्हापासूनच त्यांच्या टीमचा गणेशोत्सव सुरू झाला. त्यामुळे यंदाचा उत्सव अधिक खास झाल्याचं त्या सांगतात.
गणेशोत्सवाशी मेघना यांचं नातं त्यांच्या बालपणापासूनच जोडलं गेलं आहे. वयाच्या सातव्या वर्षी गणेश मंडळाच्या स्टेजवर त्यांचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स झाला होता. तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता ३८ वर्षांपर्यंत पोहोचला आहे.
यंदा त्यांना जोशी गणपती, एरंडे गणपती आणि परब गणपतीची आरती करण्याची संधी मिळाली. याशिवाय ‘झी मराठी’च्या ‘उत्सव गणेशाचा’ या कार्यक्रमाला याआधी त्यांनी व्हॉइस ओव्हर दिला आहे. यंदा मात्र निवेदिता सराफ आणि हर्षदा खानविलकर यांच्यासोबत आरती करण्याची संधी मिळाल्याने हा क्षण त्यांच्यासाठी विशेष ठरला.
“ज्या ज्या गोष्टींचं मी स्वप्न पाहिलं, त्या त्या गोष्टी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझ्यासाठी सत्यात उतरत आहेत,” असं मेघना यांनी भावुक होत सांगितलं.
गणेशोत्सवाच्या काळात घरातील विविध कामं करण्याचा आनंद मेघना यांना मिळतो. नैवेद्य बनवणे, आरती म्हणणे, गणपतीच्या कथा वाचणे, पूजेची तयारी करणे, आरतीची तयारी करणे आणि पाहुण्यांना आमंत्रण देणे, या सगळ्या गोष्टी त्या मनापासून करतात.
त्यांना खास मोदक बनवायलाही आवडतात. गणेशोत्सवाच्या काळात माहेरचे आणि सासरचे पाहुणे घरी येत असल्यामुळे घरातही उत्साहाचं वातावरण असतं. हरतालिकेच्या कार्यक्रमात मंगळागौरीचे खेळ खेळण्याची आठवणही त्यांनी सांगितली.
‘बाल गणेश’साठी डबिंग केल्यामुळे गणपतीच्या अनेक कथा त्यांना हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती आहेत. गणेशोत्सवाच्या काळात त्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि होस्टिंगही करतात.
आरतीनंतर बाप्पासोबत करतात ‘गप्पा’
गणपती बाप्पासोबतचं आपलं नातं केवळ श्रद्धेपुरतं मर्यादित नसून मैत्रीचं असल्याचं मेघना सांगतात. रात्रीची आरती झाल्यानंतर त्या काही वेळ एकट्या बाप्पासमोर बसतात.
“रात्रीची आरती झाल्यानंतर मी १०-१५ मिनिटं एकटी बाप्पासमोर बसते. तेव्हा माझ्या आणि बाप्पामध्ये गप्पा असतात,” असं त्या सांगतात. गणपतीच्या डोळ्यांमध्ये त्यांना जिवंतपणा जाणवतो आणि त्यामुळे कोणत्याही गणपतीची मूर्ती पाहताना त्यांचे डोळे त्यांना विशेष भावतात.
विसर्जनाच्या वेळी मन भरून येतं आणि पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची त्या आतुरतेने वाट पाहतात.
“बाप्पांनी मला नेहमीच कठीण प्रसंगातून बाहेर काढलं”
मेघना यांच्या आयुष्यात गणपती बाप्पाला विशेष स्थान आहे. “स्वामी आणि बाप्पा हे माझे दोन इष्ट आहेत,” असं त्या सांगतात. लहानपणापासून कोणत्याही प्रोजेक्टची सुरुवात करण्यापूर्वी त्या ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणतात. शूटिंग पॅकअप करतानाही त्यांच्या टीमकडून हाच जयघोष केला जातो.
बाप्पाने अनेक कठीण प्रसंगांतून आपल्याला बाहेर काढल्याची अनुभूती असल्याचं मेघना सांगतात. मोठं संकट येण्याआधीच बाप्पा आपली मदत करतात, असा त्यांचा विश्वास आहे.
सिद्धिविनायकाचा गजरा आणि मोदकाची खास आठवण
मेघना यांनी त्यांच्या बालपणीची एक खास आठवणही सांगितली. त्यांच्या शेजारी आठवले आजी राहत होत्या. त्या सिद्धिविनायक मंदिरात मुख्य आचारी होत्या. त्या दररोज मेघना यांच्यासाठी सिद्धिविनायकाचा गजरा आणि प्रसादातील मोदक आणायच्या.
त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत त्या रोज केसांमध्ये सिद्धिविनायकाचा गजरा घालून शाळेत जायच्या आणि त्यांच्या डब्यातही सिद्धिविनायकाचा प्रसाद असायचा. ही आठवण आजही त्यांच्या मनात तितकीच खास आहे.
२०१० मध्ये लग्न झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्याचा योग आला नसला तरी यंदा ‘सनई चौघडे’च्या टीमसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्याची त्यांची इच्छा आहे. २०१० पासून पवईतील गणपतींच्या दर्शनाला त्या आपल्या मुलीला घेऊन आवर्जून जातात.
गणपतीच्या दर्शनातून आपल्याला नवी ऊर्जा आणि चेतना मिळते, असंही त्या सांगतात.
“माझं आणि बाप्पाचं नातं कायम असंच राहील”
मेघना यांच्या मते, गणपती बाप्पा त्यांच्या मनातलं सगळं ऐकतात आणि पूर्णही करतात. त्यामुळे स्वतःला त्या भाग्यवान समजतात.
“माझं आणि बाप्पाचं एक वेगळं, निरागस, निखळ आणि नावखंळ असं मैत्रीचं नातं आहे आणि ते कायम असंच राहील. गणपती बाप्पा मोरया!” अशा शब्दांत त्यांनी बाप्पावरील आपली श्रद्धा व्यक्त केली.
यंदा ‘सनई चौघडे’च्या माध्यमातून कोकणातील गणेशोत्सव अनुभवताना मेघना यांच्या या नात्यात आणखी एका सुंदर आठवणीची भर पडली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, कुटुंबाच्या परंपरा, अभिनयाचा प्रवास आणि बाप्पावरील अढळ विश्वास यामुळे त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने खास ठरला आहे.






