
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून दीपिका बाहेर पडल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. आता या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने दीपिका ने हा चित्रपट का स्वीकारला नाही, यामागची आणखी एक बाजू सांगितली आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, दीपिका कोणत्याही चित्रपटासाठी कमिटमेंट करण्यापूर्वी त्याची संपूर्ण कथा ऐकून घेण्याला प्राधान्य देतात. पूर्ण नरेशन मिळाल्याशिवाय ति कोणत्याही प्रोजेक्टला होकार देत नाहीत. त्यामुळे ‘स्पिरिट’च्या बाबतीतही सुरुवातीपासूनच तिची या प्रोजेक्टसाठी पूर्ण कमिटमेंट नव्हती, असा दावा करण्यात आला आहे.
घटनाक्रमाशी संबंधित सूत्राने दावा केला आहे की, दीपिका आणि संदीप रेड्डी वांगा यांची त्यांच्या आयुष्यात केवळ एकदाच भेट झाली होती. विशेष म्हणजे, या भेटीसाठी दिग्दर्शक तब्बल एक तास उशिरा पोहोचल्याचेही सूत्राने म्हटले आहे.
या भेटीदरम्यान दीपिकांना चित्रपटाबद्दल केवळ एका ओळीची माहिती देण्यात आली होती. मात्र, तिला संपूर्ण कथा किंवा पूर्ण नरेशन देण्यात आले नव्हते, असा दावा सूत्राने केला आहे. त्यामुळे ‘स्पिरिट’ हा दीपिकाच्या विचारात असलेला प्रोजेक्ट सुरुवातीपासूनच नव्हता, असेही सूत्राचे म्हणणे आहे.
दीपिका पादुकोण गेल्या वर्षी प्रभासच्या मुख्य भूमिकेतील ‘स्पिरिट’साठी संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत चर्चेत होत्या. मात्र, एप्रिल २०२५ मध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट सोडल्याची बातमी समोर आली.
यामागे अभिनेत्रीने आई झाल्यानंतर दररोज ठरावीक ८ तास काम करण्याची मागणी केल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. मात्र, प्रोडक्शन टीमकडून ही मागणी मान्य करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या निर्णयामागे मानधन, कामाचे तास आणि इतर व्यावसायिक कारणांबाबतही चर्चा झाली.
दरम्यान, दीपिकाच्या जागी तृप्ती डिमरीची निवड झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. काही रिपोर्ट्समध्ये इंटिमेट सीन्सबाबत अभिनेत्री सहज नव्हती, त्यामुळे तिने चित्रपट सोडल्याचा दावा करण्यात आला होता.
दीपिका ‘स्पिरिट’मधून बाहेर पडल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी एका अभिनेत्याला कथा ऐकवल्यानंतर त्याच्यावर १०० टक्के विश्वास ठेवण्याबाबत भाष्य केले होते. या पोस्टचा अप्रत्यक्ष संबंध दीपिकाशी असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. याच आठवड्यात संदीप रेड्डी वांगा यांचे भाऊ प्रणय रेड्डी वांगा यांनी दीपिका यांनी चित्रपटाच्या नफ्यातील १० टक्के वाटा मागितल्याचा दावा केला. मानधन आणि कामाच्या वेळेसह हीदेखील एक मागणी होती, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी दीपिका पादुकोण ने इंस्टाग्रामवरील एका पोस्टला लाईक केले. या पोस्टमध्ये संदीप आणि प्रणय रेड्डी वांगा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच, अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील पुरुष कलाकारांना मिळणाऱ्या समान गोष्टींचीच मागणी केली असल्याचे सांगत तिचे समर्थन करण्यात आले होते.
‘स्पिरिट’मध्ये आता तृप्ती डिमरी
दीपिकाच्या बाहेर पडल्यानंतर तृप्ती डिमरीला ‘स्पिरिट’मध्ये फीमेल लीड म्हणून कास्ट करण्यात आले. तृप्ती आणि प्रभासचा फर्स्ट लूक २०२६च्या नववर्षाच्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात विवेक ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्पिरिट’ ५ मार्च २०२७ रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दीपिकाचे आगामी चित्रपट
दरम्यान, दीपिका पादुकोण सध्या दोन महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ‘किंग’ या चित्रपटात ती पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती दिग्दर्शक एटली यांच्या ‘राका’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.