( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
नावापासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये नेमका बच्चन कोण, याचे रहस्य आता उलगडले आहे. श्रुती मधुदीप या चित्रपटात ‘पाच फुटाचा बच्चन’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नाटकानंतर त्याच भूमिकेतून सिनेमात पदार्पण करण्याची संधी मिळाल्याने श्रुतीसाठी हा प्रवास विशेष ठरला आहे.
लहानपणापासूनच श्रुतीचा कल कला क्षेत्राकडे होता. गाणं, नृत्य आणि अभिनयाची आवड असलेल्या श्रुतीने तब्बल आठ वर्षे कथकचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिने नाटक आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम करण्यास सुरुवात केली.
ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम करण्याची संधीही श्रुतीला मिळाली. या अनुभवातून तिला चित्रपट हे माध्यम समजून घेण्यास मदत झाली. कथा आणि आशयाकडे पाहण्याची दृष्टी तसेच कलाकार म्हणून व्यक्तिरेखा कशी जगायची, याचे मार्गदर्शन तिला या काळात मिळाले.
सुमित्रा भावे यांच्या ‘साखरेपेक्षा गोड’ या शॉर्टफिल्ममध्ये श्रुतीने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या नाटकाच्या माध्यमातून तिला वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली.
श्रुतीने ‘पाच फुटाचा बच्चन’मधील भूमिकेविषयी बोलताना सांगितले की, शहरी वातावरणात वाढलेल्या तिच्यासाठी कोल्हापूरच्या रांगड्या मुलीची भूमिका साकारणं हा एक वेगळा अनुभव होता. या भूमिकेमुळे तिला अभिनयातील नवा पैलू अनुभवता आला.
मूळ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच कथेवर चित्रपट तयार झाला आहे. नाटकाचं सिनेमात रूपांतर होणं आणि त्यात आपलीच मध्यवर्ती भूमिका कायम राहणं, हा अनुभव स्वप्नवत असल्याचं श्रुतीने सांगितलं.
Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटात श्रुती मधुदीपसोबत गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून श्रुती मधुदीपच्या रुपेरी पडद्यावरील पदार्पणाकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.






