
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Hanuman Ansh Global Release: नीम करोली बाबांचं नाव घेताच अनेक भक्तांना महावीर हनुमानांची आठवण होते. प्रेम, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे हे महान संत भारतासह जगभरातील अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांसारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींवरही त्यांच्या विचारांचा प्रभाव पडल्याचं सांगितलं जातं. आता याच महान संतांची जीवनकथा ‘हनुमान अंश’ या हिंदी भक्तिपर चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
भारतीय चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘हनुमान अंश’च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. होम्बले फिल्म्सने या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी स्वीकारली असून, ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.
‘हनुमान अंश’ची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केलं आहे. भक्तांकडून भगवान हनुमानांचा अवतार मानले जाणारे नीम करोली बाबा ‘महाराज-जी’ या नावानेही प्रसिद्ध होते.
भक्तीबरोबरच प्रेम, सेवा आणि मानवतेचा मार्ग त्यांनी आपल्या शिकवणीतून सांगितला. त्यांच्या विचारांनी भारताबरोबरच परदेशातील अनेक आध्यात्मिक साधकांनाही आकर्षित केलं.
१९६० आणि १९७०च्या दशकात नीम करोली बाबांच्या आध्यात्मिक प्रभावामुळे अनेक पाश्चिमात्य साधक भारतात आले. उत्तराखंडमधील कैंची धाम हे त्यांच्या भक्तांसाठी आजही श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं.
बाबांच्या भक्तांमध्ये जगातील काही प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. Appleचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स, Metaचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स यांनी विविध प्रसंगी नीम करोली बाबा किंवा त्यांच्या आध्यात्मिक प्रभावाचा उल्लेख केला आहे.
स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग यांचाही संबंध
स्टीव्ह जॉब्स १९७४ मध्ये आध्यात्मिक शोधाच्या प्रवासात भारतात आले होते. त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार मार्क झुकरबर्ग यांनीही आयुष्यातील कठीण काळात कैंची धामला भेट दिल्याचं सांगितलं जातं.
याशिवाय अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स यांनीही आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलताना नीम करोली बाबांचा उल्लेख केला आहे. भारतातील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही कैंची धामला भेट दिल्याचं समोर आलं आहे.
‘हनुमान अंश’ला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, सुरुवातीला केवळ १० लाख रुपयांची ओपनिंग मिळाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली गती पकडली. प्रदर्शनाच्या २६व्या दिवसापर्यंत चित्रपटाने ६३.८२ कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा केला जात आहे.
चित्रपटाच्या कथानकाला मिळालेल्या सकारात्मक वर्ड-ऑफ-माउथमुळे त्याची चर्चा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. आता भारतातील प्रतिसादानंतर चित्रपट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष लागलं आहे.
जगभर पोहोचणार महाराज-जींची कथा
होम्बले फिल्म्स ‘हनुमान अंश’च्या माध्यमातून केवळ एका चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जात नाही, तर भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील एका प्रभावशाली संताची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
११ सप्टेंबर २०२६ रोजी ‘हनुमान अंश’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, कैंची धामपासून सुरू झालेली महाराज-जींची प्रेरणादायी कथा आता ग्लोबल प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.