(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Bhata Movie: पारंपरिक समाजरचनेत प्रत्येक समाजघटकाच्या कामाचे स्वरूप निश्चित केलेले होते. मात्र, बदलत्या काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि नव्या पिढीने नवी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. याच बदलाची आणि संघर्षाची कथा ‘भाटा’ या आगामी मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, तो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
व्ही. डि. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह प्रस्तुत ‘भाटा’ची निर्मिती अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने केली आहे. सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख, मितेश पराडकर आणि सुनील कातकर सहनिर्माते आहेत.
भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची असून, पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांनी लिहिले आहेत. श्रेयस आंगणे यांनी गीतलेखनासोबत संगीताचीही जबाबदारी सांभाळली आहे. छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अरुण नलावडे, प्रशांत मोहिते, अभिनेत्री रुपाली जाधव, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रेमा किरण आणि बालकलाकार तनिष्का जाधव यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
पिढ्यानपिढ्या दगड फोडत उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजातील एका बापाची ही कथा आहे. आपल्या मुलांनीही आपल्यासारखंच आयुष्य जगू नये, तर त्यांनी शिक्षण घेऊन चांगलं भविष्य घडवावं, असं या बापाचं स्वप्न आहे. मात्र, गरिबी, परिस्थिती आणि समाजाच्या पारंपरिक विचारांशी संघर्ष करत मुलांना नवी दिशा देण्याचा त्याचा प्रवास सोपा नसतो.
शिक्षण, नव्या पिढीची स्वप्ने आणि प्रथा-परंपरा या विषयांना केंद्रस्थानी ठेवत ‘भाटा’मधून एक वेगळा सामाजिक अनुभव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. टीझरमधून चित्रपटाच्या कथानकाची झलक पाहायला मिळत असून, दमदार कलाकार आणि आशयपूर्ण विषयामुळे ‘भाटा’कडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
‘भाटा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



