(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Chikizing Movie: बालपणीच्या निरागस खोड्या, कल्पनाविश्वातील गमतीजमती आणि लहान मुलांच्या भावविश्वातील विविध रंग मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहेत. राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘चिकीझिंग’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील ‘चला चला मामाच्या गावाला…’ हे नवे गाणे व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला अभिनेते उपेंद्र लिमये यांचा दमदार आवाज लाभला आहे. हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
‘चला चला मामाच्या गावाला…’ या गाण्यात ग्रामीण बोलीचा खट्याळ बाज, मुलांच्या मनातील धाक आणि गमतीदार प्रसंगांची रंगत पाहायला मिळते. उपेंद्र लिमये यांनी आपल्या आवाजातील विविध चढ-उतार, दरडावणीचा आविर्भाव, खट्याळ हास्य आणि वेगवेगळ्या पात्रांच्या ढंगातील संवादफेक यांमधून गाणे अधिक जिवंत केले आहे. त्यांच्या नाट्यमय आवाजामुळे हे गाणे जणू एखाद्या छोटेखानी गोष्टीचा अनुभव देतं.
सतीश तांदळे यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. अभ्यासाकडे पाठ फिरवणाऱ्या एका खोडकर मुलाला धाक दाखवून शिस्त लावण्याचा प्रसंग त्यांनी मजेशीर शब्दांत मांडला आहे. हृषिकेश कुलकर्णी यांच्या संगीतामुळे गाण्याला बालगीतांचा गोडवा आणि नाट्यमय रंग मिळाला आहे. वेगवान ठेका आणि प्रसंगानुसार बदलणारे पार्श्वसंगीत यामुळे गाण्याची रंगत अधिक वाढते.
बालकलाकार कृष्णराज वाईंगडेची लक्षवेधी भूमिका
चित्रपटात ‘चिक्या’ची भूमिका बालकलाकार कृष्णराज वाईंगडे साकारत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील भाव, निरागस खोडकरपणा आणि मनातील भीती यांचा सुंदर समतोल गाण्यातील दृश्यांमधून दिसतो. स्वप्नातून दचकून जागे होण्यापासून आई आणि बहिणीशी होणाऱ्या संवादापर्यंतच्या प्रसंगांत त्याच्या सहज अभिनयाची झलक पाहायला मिळते.
ग्रामीण भागातील साधी घरे, कौलारू घरांची रचना, मोकळी शेतं आणि निसर्गरम्य परिसर यांचा चित्रपटाच्या दृश्यांमध्ये सुरेख वापर करण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या विविध कोनांतून ग्रामीण परिसराचे सौंदर्य आणि बालमनातील भीती प्रभावीपणे टिपण्यात आली आहे.
‘चिकीझिंग’मध्ये प्रभाकर मोरे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी, डॉ. सोनाली घाटणेकर आणि बालकलाकार कृष्णराज वाईंगडे यांच्या भूमिका आहेत.
दीपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत. राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी लेखन-दिग्दर्शन केले आहे.
प्रवीण सोनावणे यांनी छायांकन, तर शेखर गुरव आणि एस. शंकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रीनिधी व्यंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. सुरेश कुंभार यांनी कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.
बालविश्वातील गंमत, ग्रामीण जीवनाचा गंध आणि कल्पनारम्य प्रसंगांची रंगत घेऊन येणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.






