(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने २००० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला, भक्तांना आलेल्या प्रचिती आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारिक अनुभवांचा प्रवास या मालिकेतून उलगडला जातो. आता या मालिकेने २००० भागांचा टप्पा गाठल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील गोडसे यांनी अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. स्वामींच्या पवित्र भूमीत हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करताना त्यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले.
मालिकेचे २००० भाग पूर्ण होणे हा सुनील गोडसे यांच्यासाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांनी मालिकेवर आणि स्वामींच्या भूमिकेवर जे प्रेम केले, तो स्वामींचाच आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वामींच्या लीला, भक्तांना आलेल्या प्रचिती आणि त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभव साकारताना दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वामींनी अनेक भक्तांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन दिले आहे. त्यांच्या अगाध महिम्याचा आणि भक्तीचा प्रवास मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे गोडसे यांनी म्हटले. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत महाआरती आणि महाप्रसादाच्या माध्यमातून मालिकेच्या यशाचा आनंद साजरा करता आला, यापेक्षा मोठे समाधान नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. यापुढेही स्वामींची सेवा अशीच घडत राहावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना असल्याचे ते म्हणाले.
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचे २००० भाग पूर्ण होणे हा केवळ मालिकेच्या यशाचा टप्पा नसून स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि प्रेक्षकांच्या अतूट प्रेमाचा उत्सव आहे. स्वामींच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने मालिकेचा हा भक्तिमय प्रवास असाच सुरू राहणार आहे.






