(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
HM Cinema: मुंबईतील दादर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक विश्वाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. याच दादरमध्ये आता सिनेरसिकांसाठी मनोरंजनाचे एक नवे दालन खुले झाले आहे. दादर पूर्व येथील ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाचे आधुनिक रूपांतर होऊन ‘HM Cinema’ या नव्या चित्रपटगृहाचे दिमाखदार उद्घाटन पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी यांच्या शुभहस्ते या चित्रपटगृहाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिक सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृह काळानुसार ‘हिंदमाता गोल्ड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. आता याच जागेवर कुमार फन शॉपच्या दुसऱ्या मजल्यावर ‘HM Cinema’ नव्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक ध्वनीप्रणाली, दर्जेदार डिजिटल स्क्रीन आणि आरामदायी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सिनेरसिकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अधिक दर्जेदार अनुभव घेता येणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना अभिनेता अंकुश चौधरी यांनी दादरच्या सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक वारशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “दादर हे मुंबईच्या संस्कृतीचे आणि चित्रपटप्रेमाचे हृदयस्थान आहे. एकेकाळी ‘हिंदमाता’, नंतर ‘हिंदमाता गोल्ड’ आणि आता ‘HM Cinema’च्या आधुनिक रूपात प्रेक्षकांसाठी हे दर्जेदार थिएटर पुन्हा सज्ज झाले आहे, याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.”
आजच्या काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहात उत्कृष्ट साऊंड, व्हिज्युअल्स आणि आरामदायी वातावरण अपेक्षित असते. HM Cinema प्रेक्षकांच्या या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केला. तसेच मराठीसह सर्व भाषांतील चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, अशी सदिच्छाही त्यांनी दिली.
View this post on Instagram
‘सर्वोत्तम चित्रपट अनुभव देणे हेच उद्दिष्ट’
HM Cinemaचे मालक संकेत पाटील यांनीही या नव्या उपक्रमाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्रेक्षकांना सर्वोत्तम चित्रपट अनुभव देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘हिंदमाता’पासून सुरू झालेला हा वारसा पुढे नेऊन, दादरसारख्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक भागात ‘HM Cinema’ सुरू करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे.”
चित्रपटगृहात आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम स्क्रीन आणि आरामदायी बैठक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अंकुश चौधरी यांच्या हस्ते या नव्या प्रवासाची सुरुवात होणे ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचेही संकेत पाटील यांनी नमूद केले. त्यांनी सर्व सिनेरसिकांना HM Cinemaमध्ये येऊन चित्रपटांचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
दादरमधील सिनेरसिकांसाठी नवे आकर्षण
ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाला आधुनिक स्वरूप देत सुरू झालेल्या HM Cinemaमुळे दादरमधील सिनेरसिकांना नव्या चित्रपटगृहाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अत्याधुनिक सुविधा आणि आरामदायी वातावरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमॅटिक अनुभव देण्याचा या चित्रपटगृहाचा प्रयत्न आहे. त्यामुळे दादरच्या चित्रपटप्रेमींसाठी HM Cinema हे नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






