(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Janak Marathi Movie : एका घटनेने बदलणारं आयुष्य, सत्यासाठी उभा राहणारा संघर्ष आणि न्यायासाठी सुरू होणारी लढाई… या सगळ्याची झलक ‘जनक’च्या मोशन पोस्टरमधून पाहायला मिळते. अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर. टी. बी. फिल्म्स प्रस्तुत या आगामी मराठी कोर्टरूम ड्रामाचा मोशन पोस्टर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मोशन पोस्टरमधील गूढ वातावरण आणि संघर्षाची तीव्रता चित्रपटाच्या कथेबद्दल उत्सुकता वाढवते. नेमकं सत्य काय आणि न्यायाच्या या लढाईत कोण जिंकणार, याची उत्सुकता ‘जनक’च्या मोशन पोस्टरने निर्माण केली आहे.
‘जनक’च्या मोशन पोस्टरमधून आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका घटनेभोवती फिरणाऱ्या संघर्षाची झलक समोर येते. त्या एका घटनेनंतर सुरू होणारी ही लढाई एका व्यक्तीच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनते आणि त्याचवेळी न्यायव्यवस्थेसमोरही अनेक प्रश्न उभे राहतात.
काही सेकंदांच्या या मोशन पोस्टरमधून चित्रपटातील संघर्षाची तीव्रता आणि पुढे उलगडणाऱ्या रहस्याची उत्सुकता निर्माण होते. नेमकं सत्य काय आहे आणि न्यायाच्या या लढाईत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
अविनाश नारकर, सायली संजीव प्रमुख भूमिकेत
आर. टी. बी. फिल्म्स निर्मित आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामामध्ये अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
याशिवाय विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
कथा, पटकथा आणि संवादाची जबाबदारी ओंकार भसमे यांच्याकडे
‘जनक’चं दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केलं असून, चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भसमे यांनी केलं आहे. त्रिलोक सिंग राजपूत हे असोसिएट प्रोड्युसर असून, सुजीत मुकाटे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य कडताने यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी घेतली आहे.
‘एक स्त्री… एक सत्य… आणि एक लढा’
‘एक स्त्री… एक सत्य… आणि एक लढा’ या तीन सूत्रांभोवती ‘जनक’ची कथा गुंफण्यात आली आहे. एका घटनेनंतर समोर येणारं सत्य, त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि न्यायासाठी सुरू होणारी लढाई या सगळ्याचा थरारक अनुभव चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
मोशन पोस्टरमुळे चित्रपटाच्या कथानकाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, नेमकं सत्य काय आहे आणि या लढाईचा शेवट कोणाच्या बाजूने होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर. टी. बी. फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ हा थ्रिलर कोर्टरूम ड्रामा नोव्हेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






