सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मलप्पुरम येथील एस्टर मिम्स मदर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या १७ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचे प्रमोशन व्हिडिओ पाहिले होते. या क्रीममुळे चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग आणि वांग निघून जातात, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. त्या जाहिरातीला भुलून मुलीने इन्स्टाग्रामवर दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून विक्रेत्याशी संपर्क साधला आणि क्रीम मागवली. सुरुवातीला चेहऱ्यावर फरक दिसल्याने तिने एका वर्षात अशा अनेक बाटल्या मागवून वापरल्या.
क्रीमच्या सततच्या वापरामुळे काही दिवसांतच मुलीची प्रकृती वेगाने बिघडू लागली. तिचे ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ लागले आणि तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडू लागली. याशिवाय तिच्या पायांवर मोठी सूज आल्याने चालणेही कठीण झाले. प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीवर उपचार करणाऱ्या नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गौरी एस. यांनी सांगितले की, वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिच्या रक्तात आणि शरीरात पाऱ्याची पातळी अत्यंत धोकादायक स्तरावर वाढलेली आढळली. तपासात तिला ‘मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी’ नावाचा किडनीचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले.
डॉक्टरांच्या मते, शरीरातील पारा किडनीच्या गाळण्याच्या प्रक्रियेला मोठे नुकसान पोहोचवतो. जेव्हा संबंधित फेअरनेस क्रीमची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यात तब्बल १२,५०० पार्ट्स पर मिलियन (PPM) पारा आढळून आला, तर सामान्यपणे ही सुरक्षित मर्यादा १ पीपीएमपेक्षाही कमी असते. म्हणजेच क्रीममध्ये विषारी पाऱ्याचे प्रमाण अत्यंत भयानक होते.
पीडित मुलीने प्रकृती बिघडल्याची माहिती संबंधित कंपनीला दिली असता, सुरुवातीला त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याचे सांगितले आणि नंतर मेसेजला उत्तर देणेच बंद केले. आता मुलीच्या कुटुंबीयांनी कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या क्रीमचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, केरळ राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाने आरोग्य सेवा संचालक, राज्य पोलीसप्रमुख, औषध नियंत्रक, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे तातडीने अहवाल मागवला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
Ans: इन्स्टाग्रामवरील प्रमोशन व्हिडिओ पाहून मागवलेली फेअरनेस क्रीम वर्षभर वापरल्याने तिच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढले आणि तिला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी' हा किडनीचा गंभीर आजार झाला.
Ans: प्रयोगशाळेतील तपासणीत या क्रीममध्ये तब्बल १२,५०० पार्ट्स पर मिलियन (PPM) इतका पारा आढळला, जो सामान्य मर्यादेपेक्षा (१ पीपीएमपेक्षा कमी) हजारो पटीने अधिक आहे.
Ans: पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर केरळ राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाने स्वतःहून गुन्हा दाखल करत आरोग्य व पोलीस विभागाकडून अहवाल मागवला आहे.






