
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jayanti 2 Teaser: दिग्दर्शक शैलेश बळीराम नरवाडे यांच्या गाजलेल्या ‘जयंती’ चित्रपटानंतर आता ‘जयंती २’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. सामाजिक आशयामुळे चर्चेत राहिलेल्या पहिल्या भागानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘जयंती २’चा टीझर पाहता, हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावर भाष्य करणारा असल्याचे दिसते. ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीला शिक्षण घेताना सहन करावा लागणारा भेदभाव आणि तिचा संघर्ष ही या चित्रपटाची मध्यवर्ती कथा असणार असल्याची झलक टीझरमधून पाहायला मिळते.
दमदार स्टारकास्टची साथ
या चित्रपटात ऋतुराज वानखेडे पुन्हा एकदा ‘संत्या’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. छायाचित्रण संजीवकुमार हिल्ली, संकलन फैसल महाडिक, तर गीत डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिली आहेत. संगीत ओंकारस्वरूप यांचे असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तरुणांवर होणारा सकारात्मक प्रभाव प्रभावीपणे मांडला होता. वेगळा विषय आणि प्रभावी मांडणीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
आता शिक्षण व्यवस्थेतील गंभीर सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा ‘जयंती २’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का, हे ११ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. टीझरमधील प्रभावी दृश्ये आणि दमदार संवादांमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता मात्र नक्कीच वाढली आहे.