( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kakula Movie: मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता ‘काकुळ’ या थरारक रहस्यपटाची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, नोव्हेंबर २०२६ मध्ये ‘काकुळ’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
मोनालिसा बागलने आतापर्यंत विविध चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता ‘काकुळ’मध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रहस्य, भय आणि सामाजिक सूडभावनेची सांगड घालणाऱ्या या चित्रपटात तिची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
गावातील श्रीमंत आणि राजकीय वारसा लाभलेला संग्राम याच्या आयुष्यात कल्पना या तरुणीचा प्रवेश होतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडू लागतात. या घटनांमागचं रहस्य काय आहे, याचा उलगडा चित्रपटात होणार आहे.
समाजातील स्त्रीविरोधी मानसिकता, पुरुषसत्ताक वृत्ती आणि वाईट कर्मांची फळं या महत्त्वाच्या विषयांवर ‘काकुळ’ भाष्य करणार आहे. त्यामुळे केवळ भय आणि रहस्याचा थरारच नाही, तर सामाजिक आशयाची जोडही या चित्रपटाला आहे.
मोनालिसा बागलसोबत अक्षय टंकसाळे, संजय खापरे, यश डिंबळे, भूषण मंजुळे, आरती शिंदे, विवेक यादव आणि प्रकाश धिंडले हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘स्वप्निल गोगावले एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्वप्निल विजया सहदेव गोगावले यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून गौरी गोगावले, सोनाली लगड, सोमा दास आणि डॉ. सचिन भालेराव सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज रघुनाथ पडवळ यांनी केलं आहे.
चित्रपटातील गाण्यांना उदय देशपांडे, पी. शंकरन आणि सिद्धांत बोरावके यांनी संगीत दिलं आहे. तर छायांकनाची जबाबदारी वीरधवल पाटील यांनी सांभाळली आहे.
नोव्हेंबरमध्ये होणार रहस्याचा उलगडा
रहस्य, भय आणि सामाजिक सूडभावना यांचा अनोखा मेळ असलेला ‘काकुळ’ प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. चित्रपटाची कथा समाजातील काही गंभीर वास्तवांवर भाष्य करणारी असल्याने प्रेक्षकांना विचार करायला लावणारा अनुभवही मिळण्याची शक्यता आहे.
‘काकुळ’मधील या रहस्याचा उलगडा नेमका कसा होणार, हे पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना नोव्हेंबर २०२६ची वाट पाहावी लागणार आहे.






