
द इंडिया स्टोरी'वर श्रेयस तळपदेंची प्रतिक्रिया , The India Story
‘या चित्रपटानंतर मी काय खातो याचा गंभीरपणे विचार करू लागलो’
‘द इंडिया स्टोरी’ची कथा ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवनातही मोठा बदल झाल्याचे श्रेयस तळपदे यांनी सांगितले.त्यांनी म्हटले, “या चित्रपटाचे काम सुरू केल्यापासून मी माझ्या खाण्यापिण्याकडे खूप गांभीर्याने पाहू लागलो. आधी मी कधीच एवढा विचार करत नव्हतो. आज घरातलं अन्न खातानाही हा भाजीपाला कुठून आला, त्यामध्ये किती कीटकनाशके आहेत, हे मनात येतं.”ते पुढे म्हणाले की, आता घरी भाज्या योग्य प्रकारे स्वच्छ धुतल्या आहेत का, याचीही ते खात्री करून घेतात.
‘हे असंच सुरू राहिलं तर आपण नष्ट होऊ’
देशातील शेती आणि अन्न उत्पादनाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना श्रेयस यांनी स्पष्ट इशारा दिला.”आज ज्या पद्धतीने रासायनिक शेती सुरू आहे, ती अशीच सुरू राहिली तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आपल्या पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर आताच पावलं उचलावी लागतील,” असे ते म्हणाले.त्यांच्या मते, हरित क्रांतीनंतर आता देशात ‘ऑर्गेनिक क्रांती’ घडण्याची गरज आहे.
‘ही कथा प्रत्येक घराशी संबंधित आहे’
श्रेयस तळपदे यांनी सांगितले की, दिग्दर्शक चेतन यांनी जेव्हा त्यांना ही कथा ऐकवली, तेव्हाच हा चित्रपट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यांच्या मते, एका सामान्य कुटुंबावर अन्नातील विषारी घटकांचा कसा परिणाम होतो, हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.”ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मला वाटलं. अशा चित्रपटाचा भाग होण्याचं भाग्य मला मिळालं,” असे त्यांनी सांगितले.
भारतीय लष्करातील मेजरच्या भूमिकेत श्रेयस तळपदे
या चित्रपटात श्रेयस तळपदे भारतीय लष्करातील मेजरची भूमिका साकारत आहेत.आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, देशासाठी दहशतवाद्यांशी लढणारा हा अधिकारी स्वतःच्या कुटुंबावर संकट आल्यानंतर पूर्णपणे हतबल होतो.”हे पात्र साकारताना अनेक प्रसंग अतिशय भावनिक होते. काही वेळा मी अभिनय करतोय हेही विसरून जायचो. त्या व्यक्तीच्या वेदना स्वतः अनुभवत असल्यासारखं वाटायचं,” असे त्यांनी सांगितले.
गावाकडच्या लेखक-दिग्दर्शकांचे कौतुक-चित्रपटाचे लेखक सागर शिंदे आणि दिग्दर्शक चेतन यांचे श्रेयस यांनी विशेष कौतुक केले.त्यांच्या मते, दोघेही ग्रामीण पार्श्वभूमीचे आणि शेतीशी जोडलेले असल्यामुळे या विषयाची खरी जाणीव त्यांना आहे.”अशा विषयावर चित्रपट बनवण्यासाठी धैर्य लागतं. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही समस्या त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे ही कथा पडद्यावर आणण्याची त्यांची तळमळ स्पष्ट दिसते,” असे श्रेयस म्हणाले.
‘मनोरंजनासोबत प्रबोधनही तितकेच महत्त्वाचे’आजच्या काळात मनोरंजनप्रधान चित्रपटांची संख्या मोठी असली तरी समाजप्रबोधन करणारे चित्रपट फार कमी असल्याचे श्रेयस यांनी नमूद केले.”सिनेमा हा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर समाजाला विचार करायला भाग पाडणारे प्रभावी माध्यम आहे. ‘द इंडिया स्टोरी’ हा त्याच प्रकारचा चित्रपट आहे,” असे ते म्हणाले.प्रेक्षकांना केलेलं आवाहन- प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असे आवाहन करताना श्रेयस म्हणाले,”हा चित्रपट केवळ अन्नातील भेसळ दाखवत नाही, तर एका निष्पाप कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं, हेही दाखवतो. चित्रपटाच्या शेवटी एका चिमुकलीचा संदेश प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडेल.”
२४ जुलैला प्रदर्शित होणार ‘द इंडिया स्टोरी’
‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट २४ जुलै रोजी तीन भाषांमध्ये देशभर प्रदर्शित होणार आहे. अन्नातील भेसळ, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या विषयावर आधारित हा चित्रपट समाजात मोठी जनजागृती घडवून आणेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.