( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं होतं. त्याने संबंधित व्हिडीओ शेअर करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीसोबतही असाच प्रकार घडला आहे.
जुई गडकरीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत एका व्हिडीओबद्दल संताप व्यक्त केला आहे. एका युट्यूब चॅनेलवरून जुईच्या लग्नाबाबत खोटी माहिती पसरवण्यात आल्याचं तिने सांगितलं आहे.
या व्हिडीओमध्ये जुई एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलासोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचंही जुईने आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
जुईने संबंधित व्हिडीओची लिंक आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली. यासोबतच तिने व्हिडीओ तात्काळ हटवण्याचा इशाराही दिला आहे. व्हिडीओ डिलीट केला नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचं तिने स्पष्ट केलं.
जुईने लिहिलं, “तुम्ही जे कुणीही असाल… प्लीज आपल्या कामाकडे लक्ष द्या. लाइक्स आणि व्ह्यूजसाठी असे फालतू व्हिडीओ बनवायला तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला नीट AI पण करता येत नाहीये. अशुद्ध भाषा… सगळंच अशुद्ध!”
पुढे तिने लिहिलं, “हा व्हिडीओ जर आजच्या आज डिलीट झाला नाही तर लवकरच कोर्टात भेटुयात. ही विनंती आहे. प्लीज सर्वांनी हे चॅनेल रिपोर्ट करा आणि या व्हिडीओलाही रिपोर्ट करा.”
दरम्यान, जुई गडकरीने संताप व्यक्त केल्यानंतर आता हा Fake व्हिडीओ युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. त्यामुळे जुईने केलेल्या मागणीनंतर संबंधित व्हिडीओ आता उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे.
कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना सोशल मीडियावर दावे केले जात असल्याने अनेकदा गैरसमज निर्माण होतात. जुईने संबंधित व्हिडीओविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रकार चर्चेत आला आहे.






