(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kon Honaar Crorepati : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन आणखी द्विगुणित होणार आहे. कारण ‘कोण होणार करोडपती’च्या दिवाळी विशेष भागात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी होणार आहेत. या खास भागाचा प्रोमो समोर आला असून त्यात माधुरी दीक्षितचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
दिवाळी विशेष भागासाठी माधुरी दीक्षितने गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. केसांमध्ये मॅचिंग गुलाबाचं फूल, नाकात नथ आणि गळ्यात आकर्षक नेकलेस असा तिचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे. या मराठमोळ्या अंदाजात माधुरीने ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एन्ट्री घेतली. यावेळी सोनाली कुलकर्णी आणि माधुरीने एकत्र फुगड्याही घातल्या. त्यांच्या गप्पांमधून दिवाळीच्या अनेक खास आठवणींना उजाळा मिळाला.
माधुरीने सांगितला अमेरिकेतील दिवाळीचा किस्सा
गप्पांच्या ओघात माधुरीने अमेरिकेत दिवाळी साजरी करतानाचा एक किस्सा सांगितला. सोनालीशी बोलताना ती म्हणाली, “आम्ही जेव्हा डेन्वरला राहत होतो, तेव्हा मीसुद्धा मुलांसाठी फटाके घेऊन यायचे. पण तिथले फटाके कसे असायचे… एक लडी लावली की असे थोडे पिक-पिक करायचे आणि मग संपायचे.”
अमेरिकेतील फटाक्यांमध्ये भारतातील फटाक्यांसारखी मजा नव्हती, असं माधुरीला सांगायचं होतं. यावर सोनालीने मिश्किलपणे उत्तर दिलं, “अरे, आमचे लक्ष्मीबॉम्ब तुझ्या फोटोंनी सजलेले होते.” सोनालीचं हे उत्तर ऐकताच माधुरी आणि सोनाली दोघीही खळखळून हसू लागल्या.
Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट
यानंतर माधुरीने रवीना टंडनला तिच्या घरी दिवाळीत कोणकोणते गोड पदार्थ बनवले जातात, असा प्रश्न विचारला. त्यावर रवीनाने सांगितलं की, त्यांच्या घरी दिवाळीत अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. लहानपणी गोड पदार्थ खाण्याच्या तिच्या आवडीवरून तिचे बाबा गंमतीने म्हणायचे की, तिचं लग्न एखाद्या हलवाईसोबत लावून देतील.
रवीना आणि सोनाली यांच्या दिवाळीच्या गोड आठवणी, माधुरीचा नऊवारीतील मराठमोळा अंदाज आणि फुगड्यांचा जल्लोष यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग रंगतदार ठरणार आहे. या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






