(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shiv Thakare: सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या आपुलकीच्या आणि खेळकर संवादशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. पाहुण्यांशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्यातील खास आठवणी जाणून घेण्यापासून ते त्यांना स्वतःविषयी मनमोकळेपणाने बोलतं करण्यापर्यंत माधुरी प्रत्येक संभाषण रंजक बनवत आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात शिव ठाकरे आणि गौतमी पाटील यांनी हॉट सीटवर हजेरी लावली. यावेळी रिॲलिटी शोमधील अनुभव आणि सोशल मीडियावर होणाऱ्या कमेंट्स यावर शिवने मनमोकळेपणाने भाष्य केले.
रिॲलिटी शोज आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीबरोबरच कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या कमेंट्सनाही सामोरं जावं लागतं. माधुरीने हाच विषय काढत शिवला त्याच्या अनुभवांबद्दल विचारलं. यावर बोलताना शिवने इंडस्ट्रीतील माणसांना हाताळण्याचा अनुभव आणि स्वतःच्या स्वभावाविषयी काही गोष्टी सांगितल्या.
शिव ठाकरे म्हणाला, “या इंडस्ट्रीत वीस-वीस वर्षांचा अनुभव असलेले लोक आहेत. माझं काम आणि वेगवेगळ्या स्तरांतील लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव मला माणसांना कसं हाताळायचं हे शिकवून गेला. मात्र, जेव्हा माझ्या स्वतःच्या माणसांचा प्रश्न येतो, तेव्हा मी त्यांच्यासाठी नेहमीच उभा राहायला तयार असतो. हे असं काही नाहीये जे मी फक्त सेटवर असताना आणि कॅमेरा चालू असतानाच करतो. जिथे कुठे परिस्थितीनुसार मी माझं योगदान देऊ शकतो, तिथं तिथं मी ते देतो. इंडस्ट्रीत तुम्हाला याची गरज असते. जर मी पूर्णपणे निष्पाप राहून या इंडस्ट्रीत आलो, तर मला इथे कोणी ओळखदेखील देणार नाही. आणि मी जर खूप इनोसंट राहिलो, तर लोक मला कामच देणार नाहीत.”
अनेक रिॲलिटी शोजमध्ये सहभागी झाल्यानंतरही स्वतःचा साधेपणा कसा टिकवून ठेवतो, असा प्रश्न माधुरीने शिवला विचारला. त्यावर शिवने कुटुंब आणि जुन्या मित्रांचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, “तुमचं खरं रूप लोकांपर्यंत पोहोचतंच. काही लोक मला म्हणतात, ‘इंडस्ट्रीत एवढा वेळ घालवल्यानंतर तू इतका इनोसंट राहूच शकत नाहीस.’ पण मी का नाही राहू शकत? जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला जवळ ठेवता, तेव्हा ते यशाची हवा तुमच्या डोक्यात जाऊ देत नाहीत.”
पुढे त्याने आईसोबतचा एक खास किस्साही सांगितला. “आज शूट सुरू होण्यापूर्वीच माझ्या आईचा फोन आला होता आणि ती म्हणाली, ‘गॅस सिलेंडर रिफिल बुक कर.’ या गोष्टी तुम्हाला जमिनीवर ठेवतात आणि वास्तवाचे भान देतात. मी अजूनही माझ्या शाळेच्या मित्रांच्या जवळ आहे आणि जेव्हा कधी मी त्यांच्यासोबत प्रवास करतो, तेव्हा मला मी कुठून सुरुवात केली होती याची आठवण होते. जेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करता, तेव्हा तुमचा प्रवासच तुम्हाला माणसांना कसं हाताळायचं हे शिकवतो,” असंही शिवने सांगितलं.
‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर झालेल्या या संवादातून शिव ठाकरेचा इंडस्ट्रीतील अनुभव, त्याचा दृष्टिकोन आणि कुटुंबाशी असलेलं नातं समोर आलं. माधुरी दीक्षितसमोर त्याने केलेल्या या मनमोकळ्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.






