(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tarini Serial: ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ आपल्या दमदार कथानकामुळे सातत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अंडरकव्हर कॉप म्हणून तारिणीने आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करत सत्य समोर आणलं आहे. आता तिच्यासमोर देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी आणि धोकादायक जबाबदारी येणार आहे
देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या भावना, वैयक्तिक आयुष्य आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवून एका गुप्त मोहिमेवर निघालेली ‘तारिणी’ आता अमृतसरमध्ये पोहोचली आहे. झी मराठीवरील या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ‘तारिणी’ची प्रमुख भूमिका साकारत असून, तिच्या आगामी मिशनमध्ये थरार आणि देशभक्तीची सांगड पाहायला मिळणार आहे.
एका गूढ संदेशापासून तारिणीच्या नव्या मिशनला सुरुवात होते. तिचा हा प्रवास तिला बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जातो. तिथे भारताविरोधात रचल्या जात असलेल्या एका मोठ्या कटाची माहिती तिला मिळते.
या कटात शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे या कटाचा शोध घेण्यासाठी तारिणीला आपली खरी ओळख कोणालाही न सांगता काम करावं लागणार आहे. अमृतसरमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे ती संशयित सलमापर्यंत पोहोचते. त्यामुळे तिच्या या मिशनमधील प्रत्येक पाऊल धोक्याचं असणार आहे.
‘तारिणी’ची भूमिका साकारणाऱ्या शिवानी सोनारने अमृतसरमधील शूटिंगचा अनुभव खास असल्याचं सांगितलं. अमृतसरला शूट करण्यासाठी जाणार असल्याचं समजल्यापासूनच ती उत्सुक होती, मात्र शूटिंग, परवानग्या आणि वेळेत काम पूर्ण करण्याबाबत थोडी नर्व्हसही होती.
मात्र अमृतसरला पोहोचल्यानंतर शूटिंगचा अनुभव खूपच चांगला राहिला. ‘सुवर्ण मंदिर’ आणि ‘जालियनवाला बाग’ यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणी शूट करण्याची संधी मिळणं हा तिच्यासाठी खास अनुभव ठरला.
शिवानीने अमृतसर-अटारी ट्रेनमध्ये शूट करण्याचा अनुभवही शेअर केला. एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी शूट करणं हीच मोठी गोष्ट असून, मालिकेसाठी अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं तिने सांगितलं.
तारिणीच्या व्यक्तिरेखेत राहून या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काम करताना तिला एक वेगळाच अनुभव मिळाला. या संपूर्ण शूटदरम्यान तारिणीचा प्रवास आणखी जवळून अनुभवता आल्याचं शिवानीने सांगितलं.
Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका
‘हा अनुभव आयुष्यभर जपून ठेवावा असा’
अमृतसरमधील शूटिंग तिच्यासाठी केवळ एक काम नसून आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव असल्याचं शिवानी सोनारने म्हटलं. या अनुभवासाठी तिने झी मराठी, निर्माते, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि ‘तारिणी’च्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
ऐतिहासिक ठिकाणांचं वातावरण, तिथला इतिहास आणि शूटिंगदरम्यान जाणवलेली ऊर्जा मनात कायम राहणार असल्याचंही शिवानीने सांगितलं. त्यामुळे ‘तारिणी’च्या अमृतसर मिशनमधून प्रेक्षकांना केवळ थरारच नाही, तर देशभक्तीची भावनाही अनुभवायला मिळणार आहे.






