
‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कार्यक्रमात बोलताना नयनताराने सर्वप्रथम प्रमोशनल इव्हेंट्सपासून ती का दूर राहते, यामागचं कारण सांगितलं. तिच्या मते, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं तिला फारसं सहज वाटत नाही. मात्र ‘टॉक्सिक’चा अनुभव तिच्यासाठी वेगळा आहे. विशेष म्हणजे यशने फोन करून कार्यक्रमाला येण्याची विनंती केली आणि त्यानंतर ती लगेच तयार झाली.
दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्यासोबत नयनताराचं नातंही जुनं आहे. जवळपास दोन दशकांपूर्वी दोघींनी एका प्रोजेक्टवर एकत्र काम केलं होतं. त्यानंतर काळ बदलला, दोघींच्या कारकिर्दीने वेगळी दिशा घेतली आणि आता पुन्हा त्या एकाच चित्रपटासाठी एकत्र आल्या आहेत.
सुरुवातीला नयनताराला ‘टॉक्सिक’मध्ये काम करण्याबाबत फारसा विश्वास नव्हता. चित्रपटात अनेक मोठे कलाकार असल्यामुळे ती थोडी साशंक होती. पण गीतूने स्वतः भेटून कथा सांगितल्यानंतर तिचा विचार पूर्णपणे बदलला. दिग्दर्शिकेची कल्पना, कलाकारांबद्दलची तिची काळजी आणि सेटवरील तिचा स्वभाव नयनताराला खूप भावला.
गीतूच्या कामाचं कौतुक करताना नयनताराने सांगितलं की, कलाकारांसाठी कठीण वेळ आली तरी ती त्यांच्यासोबत उभी राहते. फक्त दिग्दर्शन करण्यापेक्षा कलाकारांना समजून घेणं आणि त्यांना आधार देणं हा तिच्या स्वभावाचा मोठा भाग आहे, असंही तिने नमूद केलं.
यानंतर नयनताराने यशबद्दलही भरभरून बोललं. तिने त्याला प्रेमाने ‘रॉकी भाई’ म्हणत त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं. तिच्या मते, यशची लोकप्रियता जितकी मोठी आहे, तितकीच त्याची मेहनतही मोठी आहे. चित्रपटासाठी त्याने जवळपास साडेचार वर्षे दिली. कामासाठी त्याने स्वतःचा आणि कुटुंबाचा वेळ बाजूला ठेवला, ही गोष्ट नयनताराला विशेष जाणवली.
यशची पत्नी राधिकाचाही तिने आवर्जून उल्लेख केला. कलाकारांच्या मेहनतीची चर्चा होते, पण त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. यशच्या प्रवासात राधिका त्याची मोठी ताकद असल्याचं नयनताराने सांगितलं.
Mrunal Thakur : मृणाल ठाकूर १० वर्षांनी लहान क्रिकेटरला डेट करतेय? अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर
कार्यक्रमात नयनताराने कियारा अडवाणी, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि अक्षय यांचंही कौतुक केलं. रुक्मिणीच्या कामाचा प्रवास ती आधीपासून पाहत असल्याचं सांगत तिने अभिनेत्रीबद्दल अभिमान व्यक्त केला. तारा सुतारियासाठी तिने प्रेमाने ‘गोंडस राजकुमारी’ असा उल्लेख केला. तर हुमासोबत सेटवर चांगली मैत्री झाल्याचं तिने सांगितलं.
मात्र कियारासाठी नयनताराच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ‘टॉक्सिक’ हा तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. या सिनेमानंतर प्रेक्षकांना कियाराचा एक नवा अंदाज पाहायला मिळेल, असंही नयनताराने म्हटलं.
कियारानेही या भूमिकेबद्दल आपला अनुभव सांगितला. गीतू आणि यश यांनी तिच्यावर विश्वास ठेवून नादियाची भूमिका दिली, याबद्दल तिने दोघांचे आभार मानले. स्वतःमध्ये असलेली क्षमता तिला जाणवण्याआधीच या दोघांनी ती ओळखली, असं कियाराने सांगितलं. आता या सगळ्या कलाकारांची मेहनत पडद्यावर कशी दिसते, याची उत्सुकता वाढली आहे. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.