
आई तुळजाभवानी रक्षाबंधन स्पेशल
सणाच्या या मंगलमयी वातावरणात एका बाजूला रायबाच्या घरात सणाची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे महालात छोटी तुळजा आणि तिचा समवयस्क विश्वासू सोबती हरी यांच्या नात्यातली खट्याळ जुगलबंदी सुरू आहे. हरीने तुळजाकडे जगातली सर्वांत मौल्यवान वस्तू मला भिक्षा म्हणून दे…सोने नको, चांदी नको, हिरे -माणिक तर अजिबात नको. असा धोशा गेले काही दिवस लावला असून हे एक कोड आहे, ते तू ओळखायचं असे आव्हान तुळजाला दिले आहे. या कोड्याचे उत्तर या रक्षाबंधन विशेष भागात मिळणार आहे.
या भागात नेमके काय दिसणार
भक्तीचा वाढता प्रसार आणि भक्तांची अढळ श्रद्धा पाहून तिकडे महिषासुर संतापला असून, त्याने पातळदेवीमार्फत देवीच्या भक्तांवर हल्ला करण्यासाठी आपल्या मायावी असुरांना पाठवले आहे. जे भुजंगाच्या साथीने गावात हाहाःकार माजवतात. यात भुजंगच्या वारुळावरील घावाने असा कोणता चमत्कार घडतो, ज्याने संपूर्ण गाव हादरून जाते? सखूला वाचवताना नागराज स्वतःचा जीव धोक्यात घालतो, पण त्याच्या या त्यागाची किंमत काय? तुळजा विराट नागदेवीच्या रूपात का अवतरते असे अनेक प्रश्न निर्माण करणारा हा अत्यंत नाट्यमय कथाभाग या विशेष भागात उलगडणार आहे. विशेष म्हणजे याच कथाभागात तुळजाईला हरीच्या कोड्याचे उत्तर मिळते.
या अद्वितीय अद्भुत अलौकिक भक्त उद्धाराच्या प्रवासात छोटी तुळजा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भावाला जगातील सर्वात मौल्यवान आणि पवित्र भेट देणार आहे. हा भावूक आणि रोमहर्षक क्षण आई तुळजाभवानीच्या प्रेक्षकांसाठी विशेष अनुभूती ठरणार आहे.
रक्षाबंधन स्पेशल
जगभरात २८ ऑगस्टला रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. मालिकांमध्येही या निमित्ताने वेगवेगळ्या कथा पहायला मिळतात. आई तुळजाभवानी मालिका ही प्रेक्षकांची अत्यंत जिव्हाळ्याची मालिका आहे. सध्या चालू असणाऱ्या चातुर्मास पर्वात लहानपणीचे आईचे रूप दाखविण्यात येत असल्याने प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवले आहे आणि आता नक्की कोणती भेट आई तुळजाभवानी आपल्या भावाला देणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे.