
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
एका गूढ संदेशापासून तारिणीच्या नव्या मोहिमेला सुरुवात होते. अमृतसरमध्ये पोहोचल्यानंतर तिचा संपर्क बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येतो. भारताविरोधात रचल्या जात असलेल्या एका मोठ्या कटाची माहिती तारिणीला मिळते. या कटामध्ये शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
या कटाचा छडा लावण्यासाठी तारिणीला आपली खरी ओळख लपवून काम करावं लागणार आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ती संशयित सलमापर्यंत पोहोचते. या प्रकरणामागचं महत्त्वाचं रहस्य समोर आल्यानंतर तिच्यासमोर मिशनमधील सर्वात मोठं आव्हान उभं राहतं.
देशाच्या सुरक्षेसाठी तारिणीला स्वतःची ओळख बाजूला ठेवून ‘सलमा’ ही नवी ओळख स्वीकारावी लागणार आहे. प्रत्येक पाऊल धोक्याचं असलेल्या या मोहिमेत कोणत्याही क्षणी तिची खरी ओळख उघड होण्याची शक्यता आहे.
तारिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने अटारी-वाघा बॉर्डरवरील शूटिंगचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “तारिणीने मला आजवर खूप काही दिलं आहे आणि अटारी-वाघा बॉर्डरवर शूट करण्याचा हा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही.”
शूटिंगदरम्यान आपली भेट कल्याणी नावाच्या एका तरुण बीएसएफ अधिकाऱ्याशी झाल्याचंही शिवानीने सांगितलं. कल्याणीला तिची भूमिका आणि ‘तारिणी’ मालिका आवडत असल्याचं तिने सांगितलं. या भेटीचा क्षण आपल्यासाठी खूप भावनिक असल्याचं शिवानीने नमूद केलं.
“आपल्या कामातून देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो, अशी इच्छा माझ्या मनात नेहमीच होती. पण माझ्या कामामुळे ते शक्य होईल का, याची मला कल्पना नव्हती. ‘तारिणी’मुळे मला ही संधी मिळाली, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे,” असं शिवानी म्हणाली.
‘तारिणी’च्या संपूर्ण टीमचे मानले आभार
शिवानीने तिला ही भूमिका दिल्याबद्दल देवाचे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले. ‘झी मराठी’, एरिकॉन टीम, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, भीमराव मुडे, पीयूष, लेखक आणि विशेषतः प्रल्हाद कुडतरकर यांचेही तिने आभार व्यक्त केले.
“त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तारिणीची ही भूमिका मला साकारण्याची संधी दिली. भारत-पाकिस्तान सीमा अटारी-वाघा बॉर्डरवरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी कायमच खास राहील,” असं शिवानीने सांगितलं.
‘ऑपरेशन तिरंगा’च्या माध्यमातून देशाला सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी आता तारिणीसमोर आहे. या धोकादायक मोहिमेत तिची खरी ओळख गुप्त राहणार का? तारिणीला या मिशनमध्ये कोणाची साथ मिळणार? आणि भारताविरोधातील कटाचा ती कसा पर्दाफाश करणार? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये उलगडणार आहेत.
‘ऑपरेशन तिरंगा’चे विशेष भाग सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ‘झी मराठी’वर पाहता येतील.