
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Ramayana Movie: भारतीय संस्कृती आणि सिनेमासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित बहुप्रतीक्षित ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’ या चित्रपटाचा भव्य वर्ल्ड प्रीमियर लॉस एंजेलिसमधील प्रतिष्ठित अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स येथे होणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या खास सोहळ्यात तब्बल ९४५ पाहुणे सहभागी होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा आणि दिवाळीचा उत्साह जागतिक व्यासपीठावर पोहोचवणारा हा सोहळा विशेष ठरणार आहे.
‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा वर्ल्ड प्रीमियर अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्समधील डेव्हिड गेफेन थिएटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक चित्रपटसृष्टीचा इतिहास, चित्रपटनिर्मितीतील उत्कृष्टता आणि सिनेमाच्या कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित ठिकाणी भारतीय चित्रपटाचा प्रीमियर होणे, ही भारतीय मनोरंजनविश्वासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.
चित्रपटाच्या टीझरपासून ते ट्रेलरपर्यंत प्रत्येक झलक पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाची भव्यता, दमदार कलाकार आणि नेत्रदीपक दृश्यांबरोबरच रामायणाच्या मूळ कथेशी असलेली निष्ठा हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. निर्मात्यांनी या प्रकल्पाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता भारतीय संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करणारी जबाबदारी म्हणून पाहिल्याचे सांगितले जात आहे.
दिवाळीचा उत्साह पोहोचणार हॉलीवूडपर्यंत
या प्रीमियरच्या निमित्ताने लॉस एंजेलिसमध्ये भारतीय संस्कृती आणि दिवाळीचा झगमगाट अनुभवायला मिळणार आहे. रेड कार्पेटवरही भारतीय परंपरेची झलक पाहायला मिळावी, यासाठी निर्मात्यांनी पाहुण्यांना पारंपरिक भारतीय सणाच्या पोशाखात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या सोहळ्याला हॉलीवूडमधील नामवंत व्यक्तिमत्त्वे, चित्रपट निर्माते, आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारतीय सिनेमाची भव्यता आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी या चित्रपटाला मिळणार आहे.
३डीमध्ये पाहायला मिळणार चित्रपटाचा भव्य अनुभव
‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा प्रीमियर ३डी तंत्रज्ञानात होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे चित्रपटातील दृश्यांची खोली, भव्यता आणि बारकावे अधिक प्रभावीपणे अनुभवता येणार आहेत. प्रेक्षकांना रामायणाच्या विश्वाचा जवळून अनुभव घेता यावा, हा यामागील उद्देश आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी भारतासह जगभरातील प्रेक्षकांनाही हा चित्रपट ३डीमध्ये पाहण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटाचे जगभरातील अॅडव्हान्स बुकिंग २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने केली आहे. डीएनईजीने आठ ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच, प्रेक्षकांना हा चित्रपट आयमॅक्समध्येही पाहता येणार आहे.
भारताबाहेरील चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार असून, हिंदी भाषिक बाजारपेठेत धर्मा प्रॉडक्शन्स वितरण करणार आहे. त्यामुळे ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’च्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथेचा भव्य आविष्कार जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.