(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मेधा मांजरेकरांना कॅन्सरचे निदान
महेश मांजरेकांनी पहिल्यांच केलं भाष्य
बंडखोर चित्रपटात मेधा मांजरेकर?
Medha Manjrekar Cancer: अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. उपचारांनंतर आता त्या कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. त्यांच्या आजाराबद्दल पती, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सध्या महेश मांजरेकर त्यांच्या आगामी ‘बंडखोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते आणि त्यांची टीम व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत त्यांनी मेधा मांजरेकरांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.
महेश मांजरेकर यांनी News18 Lokmatला दिलेल्या मुलाखतीत मेधा मांजरेकरांच्या आजाराबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, मेधाचीही या चित्रपटात भूमिका होती. मात्र, त्यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर उपचार सुरू झाले आणि त्यांचे केस गळायला सुरुवात झाली.
उपचार आणि थेरपी सुरू असल्याचं सांगताना महेश मांजरेकर म्हणाले की, आता मेधांची तब्येत बरी आहे. “आम्ही कॅन्सरला घाबरत नाही. मी पण तिच्यासमोर एक उदाहरण आहे,” असं त्यांनी सांगितलं.
स्वतःच्या कॅन्सरच्या अनुभवाबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी सांगितलं की, ते स्वतःला कॅन्सर झाला असल्याचं वेगळं मानत नाहीत. त्यांच्या मते, लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकांना कॅन्सरचा सामना करावा लागतो.
आज कॅन्सरवर उपचार करण्यासाठी औषधं आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या आजाराकडे घाबरून पाहण्यापेक्षा शांतपणे त्याचा सामना करण्याचा दृष्टिकोन त्यांनी मांडला.
मेधा मांजरेकरांच्या आजाराबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, असंही महेश मांजरेकर यांनी सांगितलं. त्यांनी सहानुभूती नको असल्याचं स्पष्ट केलं.
उपचारांनंतर मेधांना पुन्हा दाट केस आले असून त्यांचा बॉयकट लूकही छान दिसत असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.
मेधा मांजरेकरांनी पोस्ट शेअर करत दिली होती माहिती
अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. या कठीण काळात त्यांना कोणाची साथ मिळाली आणि त्यांनी हा काळ कसा अनुभवला, याबद्दलही त्यांनी पोस्टमधून सांगितलं होतं.
आता महेश मांजरेकरांनी पहिल्यांदाच मेधांच्या आजारावर भाष्य केल्याने त्यांची ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.






